
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) जागा वाटपावरून महायुती तुटली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shiv Sena Shinde) स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन आज (ता. २९) सायंकाळी जाहीर केला आहे. मागील आठवड्याभरापासून सुरू महायुती होणार का यावर चर्चा रंगली होती.
सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात
अहिल्यानगर महापालिकेत २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. शिवसेनेकडे २४ नगरसेवक होते. शिवसेनेच्या विभाजनानंतर सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते. त्यातील २३ माजी नगरसेवक शिंदे गटात आहेत. त्यामुळे शिंदे गटाने महायुतीत २४ जागांची मागणी केली होती. मात्र, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिंदे गटाला केवळ ९ जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटात नाराजी होती. महायुतीत अवहेलना होत असल्याची भावना शिंदे गटाकडून व्यक्त होत होती.

स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर (Ahilyanagar Municipal Corporation Election)
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (ता. ३०) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीत आता भाजप व अजित पवार गटाचे जागा वाटप होणे बाकी आहे. यावर उद्या (ता. ३०) सकाळपर्यंत निर्णय होणार आहे. त्यानुसार उद्या उमेदवारी अर्ज व एबी फॉर्म दाखल होणार असल्याचे समजते.
या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेनेचे प्रभारी संजीव भोर, अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादी व भाजपमध्ये सातत्याने बैठका होत जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. शिंदेसेना बाजूला झाल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र लढण्याचा मार्गही मोकळा झालाय.त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता जागा वाटपाचा तिढा राहणार नाही, असे समोर येत आहे.
कोतकर गट कुणाबरोबर जाणार ?
माजी महापौर संदीप कोतकर व ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. या भागातून सहा ते सात नगरसेवक निवडून आणण्याची त्यांची ताकद आहे. परंतु कोतकर गट अजूनही कुठल्याही पक्षात गेलेले नाही. त्यामुळे कोतकर गट स्वतंत्र लढतो की कोणत्या पक्षाबरोबर जाते हे काही वेळात समोर येईल.


