
Somnath Gharge : नगर: अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेल्या सिसपे घोटाळ्याप्रकरणी (Sispe Infinity Scam) पोलिसांनी तपासाला निर्णायक वळण दिले असून, सीबीआयची (CBI) आवश्यक परवानगी मिळताच दुबईत लपून बसलेल्या दोन मुख्य आरोपींना भारतात आणण्यात येईल, असा ठाम विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी व्यक्त केला. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी (Vaibhav Kalburgi) हेही उपस्थित होते.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले की,
सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीच्या घोटाळ्याचा तपास अत्यंत शिस्तबद्ध व सखोल पद्धतीने करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये तब्बल १४ कोटी ४७ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुबईत पसार झाले असल्याची वस्तुस्थिती तपासात स्पष्ट झाली आहे. या आरोपींनी तेथे नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची तयारी दर्शविल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला असून, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून हा डाव उधळून लावला आहे. संबंधित आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यानंतर त्यांना हिंदुस्थानात आणण्यात येईल, असेही घाडगे यांनी स्पष्ट केले.
अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
अपहार ४०० कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता (Somnath Gharge)
या घोटाळ्याची व्याप्ती अत्यंत मोठी असून सध्या समोर आलेला आकडा हा केवळ प्रारंभिक स्वरूपाचा आहे. तपास पुढे जात असताना हा अपहार ४०० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात जे जे मोठे मध्यस्थ, एजंट व आर्थिक साखळीत सहभागी आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असून कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला. या घोटाळ्यात काही पोलीस, डॉक्टर तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक अडकले असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. यातील काही प्रकरणांमध्ये आर्थिक तणावामुळे आत्महत्या झाल्याचीही गंभीर बाब असून, या सर्व घटनांचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी कायदेशीर मार्गाने जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासात सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीसह ग्रो मोअर कंपनी (शिर्डी) आणि नगर अर्बन बँक या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये एम.पी.आय.डी. कायद्यानुसार कारवाई करत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण चार गुन्हे दाखल असून त्यामध्ये १४ कोटी ४७ लाख ९८ हजार ८४९ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गुंतवणूकदारांच्या हितासाठी या प्रकरणी शासनाकडे एम.पी.आय.डी. अंतर्गत ११३ कोटी ४२ लाख ३२ हजार ५७२ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
शिर्डीतील ग्रो मोअर व नगर अर्बन बँक अपहाराचा पाठपुरावा (Somnath Gharge)
शिर्डी येथील ग्रो मोअर कंपनीविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. तपासात या कंपनीकडून २८ कोटी ७१ लाख ५८ हजार ५२३ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून, यासंदर्भात शासनाकडे ५ कोटी ४८ लाख ५५ हजार ९५२ रुपयांचा एम.पी.आय.डी. प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
नगर अर्बन बँक प्रकरणात मात्र अपहाराचा आकडा आणखी भयावह आहे. बँकेच्या संचालकांविरोधात २९१ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांच्या अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १३ आरोपींविरोधात एम.पी.आय.डी. विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान ३ कोटी १५ लाख १ हजार ८५.०६ रुपये इतकी रक्कम फ्रिज करण्यात आली असून, ७२ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालमत्तेची एकूण किंमत ३४ कोटी ५७ लाख ७९ हजार ६१०.०५ रुपये इतकी आहे. या प्रकरणातील एम.पी.आय.डी. प्रस्तावाची एकूण रक्कम ३७ कोटी ७२ लाख ८० हजार ६९५.५६ रुपये इतकी आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या या व्यापक व कडक कारवाईमुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात अपहृत रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.


