नगर : मकरसंक्रात (Makarsankranti 2025) म्हणजे सुवासिनींचा सण,या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो,म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात. यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांती देशभरात साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांत हा फक्त एका दिवसाचा सण नाही, तर तो सलग तीन दिवस चालणारा लोकप्रिय उत्सव (Popular festival) आहे. या तीन दिवसांत निसर्ग, आरोग्य आणि समाज अशा तिन्ही पातळ्यांवर बदल घडत असतात. आता या तीनही दिवसांचे महत्त्व (The importance of all three days) काय आहे ? चला जाणून घेऊ…
संक्रांतीचा दिवस हा जरी महत्वाचा असला तरी संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’ आणि नंतरचा दिवस ‘किंक्रांत’ या नावाने ओळखला जातो. या दोन्ही दिवसांना तितकेच धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व आहे. या तीन दिवसांच्या त्रिवेणी संगमातूनच हा सण पूर्ण होतो.
नक्की वाचा: अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार
१. संक्रांतीचा आदला दिवस :’भोगी’ (Makarsankranti 2025)

संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. भोगी म्हणजे ‘आनंद उपभोगणे. हिवाळ्यातील ताज्या भाज्यांचा आस्वाद घेण्याचा हा दिवस. या दिवशी ‘खेंगट’ म्हणजे मिश्र भाजी आणि तिळाची बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा आहे. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णतेची गरज असते, ती बाजरी आणि तिळातून मिळते. तसेच, नवीन पिकांबद्दल निसर्गाचे आभार मानण्याचा हा दिवस असतो.
२. मुख्य दिवस: मकर संक्रांत (Makarsankranti 2025)

जेव्हा सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. प्रकाशाचा अंधारावर विजय म्हणून हा दिवस साजरा होतो. या दिवशी ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत जुन्या कटू आठवणी विसरून नवीन नाती जोडली जातात. या दिवशी सुवासिनी एकमेकींना ‘वाण’ देतात. या दिवशी केलेल्या दानधर्माला मोठे महत्त्व असते.
अवश्य वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
३. संक्रांतीचा नंतरचा दिवस: (Makarsankranti 2025)

‘किंक्रांत’ किंवा ‘करी’- संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला ‘किंक्रांत’ किंवा ‘करी’ असे म्हणतात. अनेकजण याला नकारात्मक मानतात, पण त्यामागे एक शौर्यगाथा आहे. संक्रांती देवीने ‘संक्रासुर’ राक्षसाचा वध केला, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ‘किंकर’ नावाच्या दैत्याचा नाश केला. म्हणूनच या दिवसाला ‘किंक्रांत’ म्हटले जाते. हा दिवस शत्रूवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. लोक मान्यतेनुसार, हा दिवस काही शुभ कार्यांसाठी टाळला जातो, कारण देवीने या दिवशी भीषण युद्ध केले होते. या दिवशीही गोड जेवण करून सणाची सांगता करण्याची पद्धत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर मकर संक्रांतीचा हा तीन दिवसांचा काळ म्हणजेच भोगीचा दिवस आपल्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायला शिकवतो, संक्रांत नात्यात गोडवा आणायला सांगते. तर किंक्रांत हा दिवस संकटांवर विजय मिळवायला शिकवतो. म्हणून मकरसंक्रातीच्या तीनही दिवसाला खूप महत्व आहे.



