
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) प्रभाग एक मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (NCP (Ajit Pawar)) गटाचा दबदबा दिसून आला आहे. या प्रभागातील ब गटात भाजपच्या शारदा ढवण (Sharda Dhawan) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती ढवण यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढवेधी लढतीत शारदा ढवण यांची सरशी झाली. अ गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. सागर बोरुडे, क गटातून दीपाली बारस्कर तर ड गटातून शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली.
नक्की वाचा: महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
ढवण विरुद्ध ढवण असा मैत्रीपूर्ण सामना
या प्रभाग रचनेत मोठा बदल झाला नाही. या प्रभागात २०१८च्या निवडणुकीत संपत बारस्कर, दीपाली बारस्कर, आशा चव्हाण व डॉ. सागर बोरुडे हे नगरसेवक झाला होते. हे चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर हे चारही नगरसेवक अजित पवार गटात दाखल झाले. २०१८च्या निवडणुकीत शरदा ढवण या शिवसेनेच्या उमेदवार २०२६च्या निवडणुकीत भाजपकडून ब गटातून निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांच्या विरोधात ज्योती ढवण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ढवण विरुद्ध ढवण असा युतीमधील मैत्रीपूर्ण सामना पहायला मिळाला. या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर शारदा ढवण यांनी बाजी मारली.
अवश्य वाचा : महाराष्ट्रातील 2 हजार 869 जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जागा महायुतीच्या झोळीत
यांना केले पराभूत (Ahilyanagar Municipal Corporation Election)
अ गटात शरद पवार गटाचे ऋषिकेश थोरात यांना डॉ. सागर बोरुडे यांनी पराभूत केले. क गटात दीपाली बारस्कर यांनी शरद पवार गटाच्या संस्कृती हालदार यांना तर संपत बारस्कर यांनी रामदास वाणी यांना पराभूत केले. या प्रभागात तीन गटांत दोन्ही राष्ट्रवादीतील लढती पहायला मिळाली. धमकावल्याच्या आरोपामुळे ड गटातील लढत चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते.


