
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) राष्ट्रवादी आणि भाजप (BJP) युतीने अभूतपूर्व यश संपादन करत महाविकासआघाडीला जोरदार चपराक दिली आहे. या निवडणुकीत (Election) युतीने तब्बल ५२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी-भाजप युतीचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे अस्तित्व वाचवण्यासाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिवाचे रान केले, मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारल्याने विरोधकांचे पूर्णतः पानिपत झाले आहे.
नक्की वाचा: महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
प्रस्थापित नेत्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मोठा दणका
या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मतदारांनी मोठा दणका दिला आहे. प्रभाग १५-ड मधून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांचा भाजपच्या सुजय मोहिते यांनी पराभव केला. तसेच, प्रभाग ९-अ मधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना शिवसेना शिंदे गटाच्या संजय शेंडगे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवांमुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्रातील 2 हजार 869 जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जागा महायुतीच्या झोळीत
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ (Ahilyanagar Municipal Corporation Election)
इतर धक्कादायक निकालांमध्ये प्रभाग १०-ड मधून शिवसेना शिंदे गटाचे सचिन जाधव यांना भाजपच्या सागर मुर्तडकर यांनी धूळ चारली. प्रभाग १२ मधून शेख नजीर अहमद यांचा दत्तात्रय कावरे यांनी, तर प्रभाग १३-अ मधून अपक्ष उमेदवार मनेष साठे यांचा राष्ट्रवादीच्या सुरेश बनसोडे यांनी पराभव केला. या दिग्गज उमेदवारांच्या पराभवामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या कुटुंबालाही या निवडणुकीत पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. त्यांच्या सून दिप्ती गांधी यांचा अतिशय निसटत्या मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे २०१८ च्या निवडणुकीतही सुवेंद्र गांधी आणि दिप्ती गांधी यांना मतदारांनी नाकारले होते, त्याचीच पुनरावृत्ती याही निवडणुकीत पाहायला मिळाली.
एकूणच निकालाचे चित्र पाहता, राष्ट्रवादी आणि भाजपने शहरावर आपली पकड घट्ट केली आहे, तर शिंदे गट तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला जनतेने पूर्णपणे नाकारल्याने, आगामी काळात शहराच्या राजकारणात विरोधकांना पुन्हा शून्यातून विश्व उभे करावे लागणार आहे.


