
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या रणधुमाळीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, शहराच्या राजकारणाने कूस बदलली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) (NCP) आणि भाजप (BJP) युतीने महाविकास आघाडीचा पूर्णतः धुव्वा उडवत तब्बल ५२ जागांवरऐतिहासिक विजय (victory) मिळवला आहे. या विजयामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी-भाजप युतीचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ‘विखे-जगताप’ जोडीने (Vikhe-jagatap) शहरावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर मनपा निवडणूक : महायुतीचा ‘महाविजय’, तर दिग्गजांना पराभवाचा धक्का!
शिवसेनेचा बालेकिल्ला कोसळला
२०१८ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंध असताना शहरात शिवसेनेचे तब्बल २४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, २०२५ च्या निवडणुकीत शिवसेनेची फाळणी आणि बदललेली राजकीय समीकरणे यांचा मोठा फटका बसल्याचे दिसते. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचे १०, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा (UBT) केवळ १ नगरसेवक निवडून आला आहे. एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगरमध्ये आता शिवसेनेची एकूण सदस्यसंख्या अवघ्या ११ वर येऊन ठेपली आहे. शिवसेनेच्या या पिछेहाटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप मैत्रीचा मोठा विजय; महाविकास आघाडीचे पानीपत
भाजप आणि राष्ट्रवादीची मोठी भरारी (Ahilyanagar Municipal Corporation Election)
दुसरीकडे, भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपल्या ताकदीत मोठी वाढ केली आहे. २०१८ मध्ये भाजपचे केवळ १४ नगरसेवक होते. मात्र, यंदा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून खिंड लढवल्याने भाजपचा आकडा २५ वर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली कामगिरी सुधारली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी ‘पायाला भिंगरी’ लावून केलेल्या प्रचारामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ १८ वरून २७ वर गेले आहे. विखे आणि जगताप या दोन युवा नेत्यांच्या युतीने केलेल्या रणनीतीपुढे विरोधकांचे सर्व डावपेच अपयशी ठरले.
हे देखील वाचा: महायुतीत लहान-मोठा भाऊ कोण? गुगली प्रश्नावर विखेंचं उत्तर


