
नगर: मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज (Zee Studios) पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग,स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Rubaab Movie Trailer Launch) सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे(Nagraj Mnajule) यांच्या उपस्थितीत पार पडला. या ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.
नक्की वाचा: पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘बाप्या’ चित्रपटाची निवड
ट्रेलरमध्ये नेमकं काय ? (Rubaab Movie Trailer)
‘तुझ्यासारखी नको,तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ चित्रपट हा केवळ एक प्रेमकहाणी नाही. स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, आत्मसन्मान जपणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या तरुणाईची ही गोष्ट आहे. एक रुबाबदार, स्वॅग असलेला नायक, त्याची ड्रीम गर्ल आणि त्यांचं गोड, हळवं आणि तितकंच बेधडक प्रेम ट्रेलरमध्ये दिसते. मात्र या प्रेमाच्या वाटेत समाज, कुटुंब आणि अनेक विरोधकांचा भक्कम अडथळा आहे. प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान यांच्या संगमातून उभं राहिलेलं हे नातं जिंकेल की, समाजाच्या दबावापुढे झुकेल? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट गृहातच मिळणार आहे. या ट्रेलरमधील रोमँटिक केमिस्ट्री, ठसकेबाज संवाद, स्टायलिश सादरीकरण, दमदार पार्श्वसंगीत आणि ऊर्जेने भरलेली दृश्य यामुळे ‘रुबाब’चा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींचे पैसे थांबवल्याने महिला आक्रमक
यावेळी नागराज मंजुळे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना म्हणाले की, “शेखर माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचे दिग्दर्शन कमाल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच कळते की, या चित्रपटाची कथा काहीतरी वेगळी आहे. संभाजी व शितल यांची जोडीही चित्रपटाच्या नावाप्रमाणेच रुबाबदार दिसत आहे. चित्रपटाचे शूट अतिशय सुंदर आणि भव्य पद्धतीने साकारले असून अप्रतिम संगीत आहे. तसेच दोघांची ऑनस्क्रीन जोडी अतिशय प्रभावी वाटते. ट्रेलर पाहताच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. मी शेखरला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला सदिच्छा देतो. मला आशा आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल.”
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, या चित्रपटाची कथा खरंतर मला २०१८ मध्येच सुचली होती, ती आता प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या चित्रपटात स्वतःची ओळख ठामपणे जपणाऱ्या तरुणाईचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आजच्या पिढीचं प्रेम बेधडक, स्पष्ट आणि स्वाभिमान जपणारं असतं. हाच रुबाब या चित्रपटात दिसणार आहे. प्रेमासाठी उभं राहाण्याची, आपल्या तत्त्वांवर जगण्याची आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याची ही कथा आहे. हा प्रेमाचा रुबाब प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.
६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित (Rubaab Movie Trailer)
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. तर संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


