Ahilyanagar News : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (All India Students’ Council) अहिल्यानगर शाखेतर्फे शहरामध्ये प्रथमतः “अहिल्यानगर युवा संसद” (Ahilyanagar Youth Parliament) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही युवा संसद दि. २५ व २६ जानेवारी रोजी जुने जिल्हाधिकारी कार्यालय,धरती चौक,अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या युवा संसदेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक विकासावर चर्चा होणार आहे. अहिल्यानगर शहरामधील सीना नदी स्वच्छता प्रकल्पावर बिल सादरीकरण होणार आहे. तसेच समान नागरी कायदा, वन नेशन वन इलेक्शन, रेग्युलेशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट इत्यादी मुद्यांवर देखील बिल सादरीकरण होणार आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी!आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुनीता विल्यम्स NASA मधून निवृत्त
दोन दिवसीय अहिल्यानगर युवा संसदेचे स्वरूप नेमकं काय ? (Ahilyanagar News)
दिवस १ – पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र पार पडेल. या सत्राला उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मा.खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अभाविप प.महा. प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी उपस्थित असतील. त्यानंतर लोकसभेचे अधिवेशन असेल, ज्यामध्ये समान नागरी कायदा, रेग्युलेशन ऑफ कोचिंग इंस्टीट्यूट आणि झिरो अवर असे तीन सत्र असतील. तिसऱ्या सत्रात विरोधी पक्षातील खासदार सत्ताधाऱ्यांना देशातील सध्याच्या घडामोडींवर प्रश्न विचारतील, सत्ताधारी बचावात्मक उत्तरे देतील. तिन्ही सत्रांकारिता सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि मंत्रिमंडळ, सभापती हे एकच असतील.
अवश्य वाचा: ‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित, तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
दिवस २ – दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्याचा शाश्वत विकास या विषयावर प्रत्येक सदस्याने तयार करून आणलेल्या ब्लू प्रिंटची मांडणी होईल. सकाळच्या सत्रात अहिल्यानगर शैक्षणिक विकासावर सामुहिक चर्चा असेल. ज्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि सिनेट सदस्य देखील प्रत्यक्षपणे सहभागी होतील. नंतरच्या दोन सत्रात प्रत्येक सदस्याला अहिल्यानगर विकासासंदर्भातील विहित केलेल्या विषयावर (उदा. कृषी, आरोग्य, पर्यावरण, पर्यटन इत्यादी) मुद्दे मांडण्या करिता २-३ मिनिटांचा वेळ दिला जाईल. तसेच त्यातील काही निवडक मुद्दे शेवटच्या सत्रात लोकप्रतिनिधी असलेल्या काही आमदारांपुढे मांडता येतील. दुसऱ्या दिवशी कोणीही सत्ताधारी किंवा विरोधक नसेल. संपूर्ण दिवसात अहिल्यानगरच्या विकासावर चर्चा होईल.
विद्यार्थ्यांसाठी युवा संसदेचे आयोजन (Ahilyanagar News)
“अहिल्यानगर युवा संसद” हा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहिल्यानगर महानगरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. शहरातील विविध महाविद्यालयातील प्रतिभावान आणि नेतृत्व करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन दिवसीय प्रति संसदीय अधिवेशन शहरात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात समान नागरी कायदा, अहिल्यानगरचा शाश्वत विकास अशा महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण पद्धतीने चर्चा व्हावी अशी योजना करण्यात आली आहे. अभाविपने महाविद्यालयीन तरुणांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणण्यासाठी ही अहिल्यानगर युवा संसद आयोजित केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, कृषी, व्यापार, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या संकल्पना थेट लोकप्रनिधींपर्यंत पोहचविण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रभावी माध्यम ठरणार आहे, त्यासाठी एक विशेष सत्र देखील दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. अहिल्यानगरच्या शैक्षणिक विकासासंदर्भात थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट आणि व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत चर्चा याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. आगामी काळात देशामध्ये समान नगरी कायदा आणि रेग्युलेशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, वादविवाद करून आलेले सर्व मुद्दे थेट केंद्र सरकार कडे पाठविण्यात येणार आहेत.



