
Dr. Pankaj Ashiya : नगर : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा (Industrial Sector) सर्वांगीण विकास साधून अधिकाधिक नवीन उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे. उद्योगांना आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते, भूखंड, बँक कर्ज व इतर मूलभूत सुविधा तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती (Job Creation) होईल, या दृष्टीने उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
‘जिल्हा उद्योग मित्र समिती’च्या बैठकीचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा उद्योग मित्र समिती’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. या बैठकीस महाव्यवस्थापक दीपक शिवदास, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योग अधिकारी अशोक बेनके, व्यवस्थापक श्याम बिराजदार, प्रकाश गांधी, अरविंद पारगावकर, हरजितसिंग वाधवा यांच्यासह अशासकीय सदस्य व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, (Dr. Pankaj Ashiya)
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक ‘त्या’ सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अहिल्यानगर येथील औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनल उभारणीसाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी. बोल्हेगाव फाटा येथील रस्त्याचे काम गतीने, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावे. औद्योगिक क्षेत्राला अखंडितपणे वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारणीच्या कामाला गती देण्यात यावी. यासाठी निधीची आवश्यकता भासत असल्यास जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. क्षेत्रामध्ये साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी पडत आहे, त्यामुळे उद्योगांनी सीएसआरच्या माध्यमातून वाहने उपलब्ध करून देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.
औद्योगिक क्षेत्रातील फीडरची आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करून या भागात अखंडित वीजपुरवठा सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. बोल्हेगाव रस्ता दुरुस्ती, सनफार्मा ते निंबळक रस्ता दुरुस्ती याबरोबरीने औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. औद्योगिक क्षेत्रात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. पावसाचे पाणी साठल्याने अनेक उद्योगांचे नुकसान होत आहे, हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा. संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर येथील औद्योगिक क्षेत्राच्या समस्याही प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.


