India vs New Zealand 2nd T20 : नगर : भारत व न्यूझीलंड यांच्यात पाच टी-२० क्रिकेट (India vs New Zealand Five T20s) सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (ता. २३) रायपूर (Raipur) येथे खेळविण्यात आला. या सामन्यात भारताने (India) न्यूझीलंडवर (New Zealand) सात गडी व २८ चेंडू राखून सहज मात केली. या क्रिकेट मालिकेत (cricket series) भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पानिपत का झाले?
प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ २० षटकांत सहा गडी गमावत २०८ धावाच जमवू शकला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने २६ चेंडूत ४४ तर कर्णधार मिचेल सँटनरने २७ चेंडूत ४७ धावांची तडाखेबाज खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक दोन फलंदाज बाद केले.
अवश्य वाचा: 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
पुढील सामना गुवाहाटी येथे (India vs New Zealand 2nd T20)
२०९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन (६ धावा) व अभिषेक शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव व इशान किशनने डाव सावरला. इशानने ३२ चेंडूत ७६ धावा फटकावल्या. तो बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमारने शिवम दुबेसह भारताला सहज विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने ३७ चेंडूत नाबाद ८२ धावा तर शिवमने १८ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, जेकब डफी व इंदरबीर सिंग सोधीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या मालिकेतील पुढील सामना २५ जानेवारीला गुवाहाटी येथे होणार आहे. हा सामना जिंकल्यास विजयाच्या हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याची संधी भारताला आहे.



