MP Nilesh Lanke : नगर: देहूनगरी ही केवळ भक्तीचीच नव्हे, तर शक्ती आणि राष्ट्रनिर्मितीचीही पवित्र भूमी आहे. याच भूमीत संत तुकाराम महाराजांच्या विचारांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्याची संकल्पना साकार केली. शिवाजी महाराजांचे मावळे हे तलवारीचे शिलेदार होण्याआधी तुकोबारायांचे (Sant Tukaram Maharaj) निष्ठावंत वारकरी होते. आधी वारकरी म्हणून घडलेले हे मावळे पुढे स्वराज्याचे कर्ते झाले, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी केले. आपला मावळा सामाजिक संघटनेच्या वतीने देहू (Dehu) येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी खासदार लंके बोलत होते.
अवश्य वाचा: बुऱ्हाणनगरला मंत्री नरहरी झिरवाळ व अभिनेते सयाजी शिंदे यांचे उपस्थितीत आगळावेगळा कार्यक्रम
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण
देहूतील प्रमुख रस्ते, नदीकाठ आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरूवर्य होते. त्यांच्या विचारांतून शिवरायांना आदर्श राज्यकारभाराची दिशा मिळाली. मावळ खोऱ्यातून सुरू झालेली ही चळवळ पुढे संपूर्ण स्वराज्याचा कणा ठरली, असेही लंके यांनी नमूद केले.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य
विविध ठिकाणी स्वच्छता साहित्याचे वितरण (MP Nilesh Lanke)
यावेळी उपस्थित पत्रकारांनी राजकीय परिस्थितीबाबत विचारणा केली असता, “ही मोहीम पूर्णतः सामाजिक असून त्यात कोणतेही राजकीय भाष्य केले जाणार नाही,” असे स्पष्ट करत खासदार लंके यांनी राजकीय प्रश्नांवर बोलणे टाळले. मोहिमेअंतर्गत देहू देवस्थान संस्थानला खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते दोन बाकडे, दोन कचरा पेट्या तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे फलक प्रदान करण्यात आले. याशिवाय गावातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास देहू देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, कीर्तनकार कुंडलिक महाराज मोरे, आपलं मावळ प्रतिष्ठान देहूनगरीचे अध्यक्ष प्रदीप काळोखे, देहूच्या माजी सरपंच रत्नमाला करंडे, सुनीता परंडवाल, संदीप शिंदे, उद्योजक गणेश शेठ काळोखे, राजेश वळसे पाटील, रमाकांत जी मोरे, बबनराव गुंजाळ, बाबासाहेब गायके चक्रधर राजदेव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला मावळा सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यभर गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण तसेच सौरऊर्जेवर आधारित दिवे बसविणे, असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमांचा मुख्य उद्देश तरुण पिढीत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे विचार रुजविणे हा आहे. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारातून आदर्श मावळे घडविले. असेच मावळे पुन्हा उभे राहून मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावेत, असे आवाहन संघटनेचे राज्य सचिव प्रा. सीताराम काकडे यांनी केले.



