
Indian Republic Day : नगर : जातीय व सामाजिक विषमता दूर करून दारिद्र्य निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असून, जातीय ओळखीपेक्षा ‘मी भारताचा नागरिक आहे’ ही ओळख अधिक दृढ होणे आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यातूनच बलशाली व आत्मनिर्भर भारताची (Atmanirbhar Bharat) निर्मिती होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली
पोलीस मुख्यालय मैदानावर शासकीय ध्वज वंदन
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Indian Republic Day) पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वज वंदन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, (Indian Republic Day)
जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राचे नवे पर्व सुरू होत असून, शिर्डी औद्योगिक क्षेत्रात सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून मोठा उद्योग प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी करत, समृद्ध व सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची वाटचाल समृद्धी व संपन्नतेकडे सुरू असून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास’ या सर्वसमावेशक धोरणातून शासन देशाचा विकास करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने विकासाला गती दिली असून, राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातून २५ ते ३० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याचे भूमिपुत्र व ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करून, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे नमूद केले.
यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस दलाचे पुरुष व महिला पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, बँड पथक, श्वान पथक, वज्रवाहन, सायबर सेल जनजागृती वाहन, क्यूआरटी वाहन, निर्भया पथक, बाँब शोधक व नाशक पथक, मोबाईल सर्व्हिलन्स वाहन, महाराष्ट्र पोलीस फॉरेन्सिक व्हॅन, बालविवाहास प्रतिबंध जनजागृती वाहन तसेच न्यू आर्ट्स अँड कॉमर्स, सैनिकी महाविद्यालय (सायन्य), आठरे पब्लिक स्कूल, श्रीराम माध्यमिक विद्यालय देवगाव (ता. नेवासा), सनफार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (नागापूर), स्नेहालय स्कूल, एमआयडीसी, आर्मी पब्लिक स्कूल (दिवटे), पाटील पब्लिक स्कूल (सुपा), मेहेर इंग्लिश स्कूल, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल या शाळांमधील मुला-मुलींच्या पथकांनी सहभाग घेतला.
‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर शहरातील सुमारे २५ माध्यमिक शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत सादर केली. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती आणि शारीरिक कसरत व व्यायाम करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
यावेळी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बालविवाह विरोधी शपथ घेतली.
कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणीतील बंदिवान, माजी सैनिक आणि निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार संगीता दळवी व डॉ. अमोल बागुल यांनी केले.


