Tobacco : पाथर्डी : शासनाच्या तंबाखू (Tobacco) विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पाथर्डी शहरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या (National Tobacco Control Committee) वतीने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २३ दुकानदार व पानटपरी चालकांकडून एकूण ५६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अचानक झालेल्या या मोहिमेमुळे शहरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये (Tobacco Sellers) खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
२६ जानेवारीला शहरात तपासणी मोहीम
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या मागील बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई राबविण्यात आली. समितीचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्यासह संबंधित पथकाने २६ जानेवारी रोजी शहरातील अर्ध्या भागात तपासणी मोहीम हाती घेतली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासना इशारा (Tobacco)
या मोहिमेदरम्यान तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आले. प्रारंभी समज व दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधितांविरुद्ध तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा २००३ अंतर्गत थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या आवारात शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायद्याचा स्पष्ट भंग असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी स्पष्ट केले. संबंधित विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेत पोलीस कर्मचारी साहेराव चव्हाण, बनकर, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी राजेंद्र सावंत तसेच स्थानिक युवक मंडळाचे प्रतिनिधी अमोल कांकरीया यांचा सहभाग होता. दरम्यान, उर्वरित शहर व तालुक्यात लवकरच छापेमारी करण्यात येणार असून ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.



