Abdul Sattar : राहाता : राहाता व शिर्डी (Shirdi) परिसरात डाळींब व फुलांचे चांगले मार्केट आहे. तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा, यासाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Agricultural Produce Market Committee) अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी (Cold storage) ११ कोटी रूपये मंजूर करत आहे, अशी घोषणा राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली. त्याबरोबर आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर करण्यात येतील, अशा शब्दात पणनमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’- रोहित पवार
विविध विकासकामांचे भूमिपूजन (Abdul Sattar)
साकुरी- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पणन, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू पाटील, उपनिबंधक गणेश पुरी, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, डी.वाय.एस.पी. शिरीष वमने, संचालक बाबासाहेब शिरसाठ, विजयराव उर्फ राजेंद्र कातोरे, ज्ञानदेव चौधरी, दत्तात्रय गोरे, दिलीपराव गाडेकर, जालिंदर गाढवे ,राहुल धावणे, संतोषराव गोर्डे, शांताराम जपे, सुभाष गायकवाड, राजेंद्र धुमसे ,सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर, रंजनाताई लहारे, मिनाताई निर्मळ, आर. एम. खेडकर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राहाता,सुभाष मोटे, प्र. सचिवसर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
शेती महामंडळाची २४ एकर जमीन बाजार समितीला हस्तांतरित (Abdul Sattar)
यावेळी महसूलमंत्री व पणनमंत्र्यांच्या हस्ते शेती महामंडळाची २४ एकर जमीन (९ हेक्टर ८२ आर) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्यात आली. जमीन हस्तांतरणाचा सातबारा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. बाजार समिती अवारातील संरक्षण भिंत, अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते, वॉटर ड्रेनेज लाईन, ऑक्शन प्लॅटफार्मचे काँक्रिटीकरण, कांदाशेड अशा १० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
पणन मंत्री सत्तार म्हणाले, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी रूपये मंजूर करण्यात येतील. यात ६ कोटींचे अनुदान असणार आहे. याचठिकाणी शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. या शेतकरी भवनाच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहील.असेही त्यांनी सांगितले. कृषीमंत्री असतांना सावळी विहीर येथील कृषी विभागाची ७५ एकर जमीन पशु वैद्यकीय महाविद्यालयासाठी पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केली, याची आठवणही सत्तार यांनी यावेळी करुन दिली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ५४० कोटींचे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राहाता तालुक्यात २ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. अतिशय पारदर्शक कारभार राहाता मार्केट कमिटीने केला आहे. देशभरातील शेतमालाचे भाव राहाता बाजार समितीत पाहता येतात.आगामी काळात शिर्डी एमआयडीसीत १ हजार कोटींची गुंतवणूक होऊन २ हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिर्डी व परिसरातील शेतकऱ्यांचा हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. गोदावरी कालव्यातून तालुक्यातील सर्व पाझर तलाव , कालवे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी शंभर कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्यात सुविधा केंद्रामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अहमदनगर जिल्ह्यात ७ लाख व राहाता तालुक्यात ५४ हजार महिलांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिर्डी ते आळंदी असे पायी दिंडी मध्ये जात असताना अपघाती मृत्यू मुखी पाडलेल्या तालुक्यातील वारकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये निधी यावेळी मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव चौधरी यांनी केले. तर संतोष गोर्डे पाटील यांनी आभार मानले.