Abhishek Kalamkar : नगर : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी नगर शहरातील एका कुटुंबाला चार वेळा आमदारकी दिली. मात्र, त्यांनी शहरात काही विकासकामे केलेली नाहीत. राज्याप्रमाणे गद्दारीची उदाहरणे नगर शहरात वेळोवेळी दिसून आली. कधी भाजप (BJP) बरोबर जाऊन महापालिकेवर झेंडा फडकवण्यात आला. त्यांनी मागील नऊ वर्षांत विकासकामांसाठी निधी का आणला नाही. २०१४पासून का आणता आला नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी उपस्थित केला.
शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात दाखल झाली. या निमित्त शहरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी अभिषेक कळमकर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, निलेश लंके, माजी आमदार दादा कळमकर, युवा प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार
अभिषेक कळमकर म्हणाले, (Abhishek Kalamkar)
राज्यात पक्षाच्या फोडा फोडीच्या राजकारणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक सोडून गेले. तरी दादा कळमकरांच्या बरोबर एकनिष्ठ व ज्येष्ठ कार्यकर्ते राहिले. आमचे कुटुंब शरद पवार यांच्या बरोबर नेहमीच राहिले आहे. मी शिवसेनेत गेलो होतो. त्याला काय कारणे होती ही जनतेला माहिती आहे. आमच्या कुटुंबाने काही गद्दारी केली असेल तर मला तिकीट देऊ नका. आमच्या कुटुंबाने गद्दारी केलेली नाही. त्यांनी शहरभर जाहिरातींचे फलक लावत आहेत. जी कंपनी सर्वांत जास्त जाहिरात करते. त्यांंची विश्वासार्थता कमी झालेली असते. महाविकास आघाडीच्या पक्षांची अंतर्गत बैठका झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक आहेत. महाविकास आघाडी नगर शहरात जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे सर्व एकत्र उभे राहणार. नगर शहरातील नागरिक त्रस्त आहेत. शहरातील महिला, नागरिक भयभीत आहेत. शहरातील गुन्हेगार कोणाच्या वाहनांत फिरतात हे जनतेला माहिती आहे, अशी नाव न घेता टीकाही कळमकर यांनी केली.