नगर : जमिनीच्या नोंदी लावण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महिला तलाठी व तिच्या खासगी मदतनीसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने काल (सोमवारी) जेरबंद केले. निकिता जितेंद्र शिरसाठ (वय ४६, तलाठी, शेंडी, ता. नगर) व संकेत रणजित ससाणे (वय २६, तलाठीचा खासगी मदतनीस) असे जेरबंद आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा : गोवंश रक्षकांवर जमावाचा गोळीबार
शेंडी येथील जमिनीच्या खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्कसोड नोंद करण्यासाठी निकिता शिरसाठ हिने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काल प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. शिरसाठने लाचेची रक्कम खासगी मदतनीस ससाणेकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील एका नाष्टा सेंटरवर संकेत ससाणेने लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या संदर्भात एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.