Accident : राहुरी: नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या (Nagar-Manmad Highway) दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात (Accident) आणखी एक बळी गेला आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात रविवारी (ता.२८) दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांचा सायंकाळी महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आंदोलनस्थळी भेट देत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास २ जानेवारी रोजी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.
अवश्य वाचा: राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक
नदीम आदम शेख (वय १९) व उमर अब्बास शेख (रा. डिग्रस, ता. राहुरी) हे दोघे दुपारी १२.३० वाजता दुचाकीवरून राहुरीहून डिग्रसकडे जात असताना डिग्रस फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नदीम शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला उमर शेख जखमी झाला असून त्याच्यावर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद
मयताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थ संतप्त (Accident)
अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थ संतप्त झाले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नगर–मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे अचानक चक्काजाम आंदोलन करण्यात आले. “जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ आंदोलनस्थळी धाव घेत नातेवाइकांचे सांत्वन केले. त्यांनी पोलीस प्रशासन व संबंधित ठेकेदारांशी मोबाईलवरून चर्चा करून जाब विचारला. “राहुरी तालुक्यातील जनतेचा जीव कवडीमोल असल्यासारखी वागणूक अधिकारी व ठेकेदारांकडून मिळत आहे,” असा आरोप करत त्यांनी नगर–मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी व रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अन्यथा २ जानेवारी रोजी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन महामार्गावर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनीही “हा राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार?” असा सवाल उपस्थित केला. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेत “वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी आहे,” असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री तनपुरे यांच्या विनंतीनंतर मयताच्या नातेवाइकांनी आंदोलन स्थगित केले. सुमारे दीड तास सुरू असलेल्या चक्काजाममुळे महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार अपघात घडत असतानाही रस्त्याच्या कामातील दिरंगाईवर प्रशासन व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



