Accident : श्रीगोंदा : श्रीगोंदा-अहिल्यानगर रस्त्यावरील काष्टी (Kashti) येथील श्रीगोंदा चौकात एक भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. सचिन शिवाजी माने आणि संतोष शिवाजी माने (दोन्ही रा. श्रीगोंदा रोड, काष्टी) असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
दुचाकीला जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. १७) पहाटे ४:०७ च्या सुमारास संतोष शिवाजी माने आणि त्यांच्यासोबत असलेले सचिन शिवाजी माने हे आपल्या दुचाकी वरून जात होते.त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका पिकअप वाहनाने भरधाव वेगाने येत दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन्ही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. या भीषण अपघातात माने बंधूंचा जागीच मृत्यू झाला.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Accident)
अपघातानंतर पिकअप चालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न कळवता, घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिवराम गांगुर्डे आणि पोलीस हवालदार आबा बी. तरटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पसार झालेल्या पिकअप चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रे हलवली आहेत.



