Robbery | नगर : टाकळी मानूर (ता. पाथर्डी) येथील दरोड्यातील (Robbery) सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तर या प्रकरणातील आणखी सात आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. आजिनाथ भागीनाथ पवार (वय २६, रा. आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड), गणेश रामनाथ पवार (वय २५, रा. ब्रम्हगव्हाण, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), विनोद बबन बर्डे (वय २७, रा. वारणी, ता. शिरुर कासार, जि. बीड), अविनाश काशिनाथ मेहेत्रे (वय २८, रा. कुळधरण रस्ता, कर्जत, ता. कर्जत), अमोल सुभाष मंजुळे (वय २३, रा. वडगाव पिंपरी, ता. कर्जत) व तुकाराम धोंडिबा पवार (रा. पाथर्डी, जि. नगर) अशी जेरबंद (Arrested) आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : RCB च्या महिला संघाने करून दाखवले! पहिल्यांदाच पटकावलं विजेतेपद
गुन्हा दाखल (Robbery)
टाकळी मानूरमधील अंबिका नगर येथील बाबासाहेब ढाकणे यांच्या घरावर बुधवारी (ता. १३) दरोडा पडला. ८-९ दरोडेखोरांनी घरातील व्यक्तींना मारहाण करत ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास केले. या संदर्भात बाबासाहेब ढाकणे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण व दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.
अवश्य वाचा : ‘गुगल मॅप’वर अहमदनगरचे झाले अहिल्यानगर
‘तो’ पाळत ठेऊन द्यायचा माहिती (Robbery)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तीन पथके रवाना केली. या पथकांनी ढाकणे कुटुंबातील व्यक्तींंकडून आरोपींचे वर्णन जाणून घेतले. तसेच बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातूनही माहिती घेतली. त्यानुसार घटनेच्या वेळी आरोपींनी वापरलेला मोबाईल बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथून चोरला असल्याचे समोर आले. दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा संदीप बबन बर्डे (रा. वारणी, जि. बीड) याने त्यांच्या १० ते १२ साथीदारांच्या मदतीने केला आहे. तो व त्याचे साथीदार त्याच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून पाथर्डीतून मोहटादेवी रस्त्याने कोठे तरी चोरी करायला जाणार आहे. त्यानुसार पथकाने पिकअपला अडवून त्यातील पाच जणांना ताब्यात घेतले. या आरोपींनी टाकळी मानूरचा दरोडा संदीप बर्डेसह आठ साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली पथकाला दिली. यासह सात आणखी गुन्ह्यांची कबुलीही आरोपींनी दिली. या सर्व गुन्ह्यांची ठिकाणे तुकाराम पवार दाखवत असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानुसार पथकाने तुकाराम पवारला ताब्यात घेतले. जेरबंद आरोपींना पथकाने पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.