Action Against DJ | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात मंगल कार्यालय, लॉन तसेच विविध कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्यांवर ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई (Action Against DJ) करण्यात येणार असल्याचा इशारा अहिल्यानगर शहर पोलिसांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे तसेच निवासी परिसरात मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकवापरल्यास संबंधित डीजे चालक मालक, मंगल कार्यालयाचे मालक आणि जनरेटर वाहन मालकांवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाने ३७ जणांना नोटिसा दिलेल्या आहेत.
हे वाचा – अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
ध्वनीमापक यंत्राव्दारे नियंत्रण नमुने
या संदर्भात अहिल्यानगर शहरातील एकूण ३७ डीजे व डॉल्बी चालक-मालक, मंगल कार्यालयांचे मालक आणि जनरेटर वाहन मालकांना भारतीय न्याय दंड संहिता कलम १६८ नुसार नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी शहरातील विविध भागात डीजे व डॉल्बी सिस्टीम कर्णकर्कश आवाजात वाजविण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ध्वनीमापक यंत्राव्दारे नियंत्रण नमुने (कंट्रोल सॅम्पल) घेण्यात आले असून संबंधितांवर व पर्यावरण ध्वनीप्रदूषण कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने मंगल कार्यालय, लॉन आणि सांस्कृतिक सभागृह मालकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कार्यक्रमासाठी जागा भाड्याने देताना आयोजकांनी ध्वनीक्षेपकाचा परवाना घेणे बंधनकारक असल्याची सूचना देणे आवश्यक आहे. तसेच रात्री १० वाजल्यानंतर कोणतेही वाद्य वाजवू नये, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि कार्यक्रमांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
अवश्य वाचा – इंग्लंडला नमवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश
ध्वनी मर्यादेचे पालन करणे बंधनकारक
याशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर ठरवून दिलेल्या वेळेतच करावा व ध्वनी मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. शासकीय कार्यालये, न्यायालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालये व धार्मिक स्थळांच्या परिसरात मोठ्या आवाजात स्पीकर वापरण्यास मनाई आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोन, निवासी झोन, वाणिज्य झोन आणि औद्योगिक झोन यासाठी निश्चित डेसिबल मर्यादा निश्चित आलेली आहे. दरम्यान, शहरात कुठेही अशा प्रकारे कर्णकर्कश आवाजात डीजे किंवा ध्वनीक्षेपक वाजविले जात असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी केले आहे.
हे पहा – VSR कंपनी मालक व्ही. के सिंगला सीआयडीकडून शाही पाहुणचार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
शहरात मंगल कार्यालय, लॉन तसेच विविध कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तशा नोटीसा दिला, मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोठा विरोध सहन करावा लागतो. यामुळे कारवाई होत नाही. नेहमीप्रमाणे डिजे वाजल्यानंतर गुन्हे दाखल होतात. मात्र डिजे वाजल्यानंतर ते जप्त करून न्यायालयात खटले दाखल केले पाहिजे. पोलिसांनी राजकीय विरोध झुगारून कारवाई केली तर हे शक्य होणार आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे किंवा डॉल्बी कर्णकर्कश आवाजात वाजविल्यास ध्वनीप्रदूषण अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच बीएनएसएस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील आणि ध्वनीक्षेपक साहित्य जप्त करण्यात येईल.
– डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक, अहिल्यानगर शहर.



