Aditi Tatkare : अकोले : महिला बचतगटांनी (Mahila Bachat Gat) उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यात 50 उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोले येथे जागा उपलब्ध झाल्यास मॉल मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिले.
नक्की वाचा : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर
महिला बचतगटांच्या वस्तू विक्री व प्रदर्शन महोत्सवाच्या उद्घाटन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला बालविकास विभाग पंचायत समिती व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या निधीतून आयोजित ‘कळसुआई’ महिला बचतगटांच्या वस्तू विक्री व प्रदर्शन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार लहामटे, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, अगस्ति साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’-अजित पवार
मंत्री तटकरे म्हणाल्या, (Aditi Tatkare)
नागपूर शहरातील 30 हजार महिलांनी या योजनेच्या मदतीने पतसंस्था स्थापन केली असून, आज तिच्यात 35 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या धर्तीवर इतरही जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक विकासासाठी जिल्ह्यातील महिलांनी एकत्र येऊन पतसंस्था सुरू कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. लाडकी बहीण योजनेच्या रूपाने महिला सक्षमीकरणासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. राज्यात 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ देण्यात आला असून अकोले तालुक्यात 83 हजार महिलांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेच्या नोंदणीत राज्यात सर्वाधिक नोंदणी केलेल्या पुणे जिल्ह्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा क्रमांक असून 12 लाख महिलांना जिल्ह्यात लाभ देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, कारण त्यांचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहील. महिलांसाठी बचतगट मेळाव्यांबरोबर आरोग्य शिबिरे आयोजीत करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उमेदचा फिरता निधी 15 हजारांहून 30 हजार करण्यात आला आहे. लखपती दीदी, ड्रोन दीदी उपक्रमाचा लाखो महिलांना लाभ देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार लहामटे, पुष्पा लहामटे, सोमनाथ जगताप यांची भाषणे झाली. लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या सुरेखा चौधरी, सुजाता अस्वले व शीला इथे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना कर्ज योजनेच्या लाभाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी महिला बचतगटांच्या स्टॉलला भेट देत महिलांशी संवाद साधला.