Adivasi : अकोले: हिरड्याला रास्त भाव जाहीर करा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करा व भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) बुडीत बंधारे बांधून आदिवासी (Adivasi) गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्या. या प्रमुख मागण्यांसाठी राजूर येथे सुरू असलेले मुक्काम आंदोलन आज (ता.8) तिसऱ्या दिवशी तीव्र करण्यात आले. राजूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत अधिकाऱ्यांच्या टेबलावर हिरडा (Haritaki) ओतून आपला निषेध व्यक्त केला.
हे देखील वाचा : नगरच्या माेडी लिपी तज्ज्ञांनी शाेधली मनाेज जरांगेंची कुणबी नाेंद
राजूर मुक्काम आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असूनही आदिवासी मंडळाच्या कोणीही आंदोलकांना भेट दिली नाही. परिणामी आंदोलकांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. भंडारदरा धरणातील पाण्यावर जिल्हा सुजलाम सुफलाम होतो. मात्र, ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी साठते त्या भंडारदरा धरणाच्या आजूबाजूच्या नऊ गावांना मात्र उन्हाळ्यात ओंजळभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर चालावे लागते. त्यामुळे बुडीत बंधारे बांधून या शेतकऱ्यांना पिण्याचे व शेतीचे पाणी द्यावे, ही मागणीही आंदोलनात घेण्यात आली आहे.
नक्की वाचा : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार
आदिवासी गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक वाड्यांना रस्ते नाहीत. आंदोलनात हे सर्व प्रश्नही घेण्यात आले आहेत. जोपर्यंत हे सर्व प्रश्न सुटत नाही, नाशिक येथून आदिवासी महामंडळाचे कार्यकारी संचालक आंदोलनाच्या मंडपात येऊन हिरडा खरेदीबाबत लेखी देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी जाहीर केले. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, ज्ञानेश्वर काकड, शिवराम लहामटे, वसंत वाघ, संगीता साळवे, निर्मला मांगे, कुसा मधे, बहिरू रेंगडे, दूंदा मुठे, लक्ष्मण घोडे, गणपत मधे, नवसु मधे, भरत झडे, श्रमिक मुक्ती दलाचे स्वप्नील धांडे, भाकपचे ओंकार नवाळी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. आज रात्रीही मुक्काम सत्याग्रह सुरूच राहणार आहे.