Afghanistan Vs New Zealand | नगर : विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज मोठा उलटफेर पहायला मिळाला. अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने बलाढ्य न्यूझीलंड (New Zealand) संघाचा तब्बल ८४ धावांनी दारुण पराभव केला. अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाझने (Rahmanullah Gurbaz) केलेल्या धावांच्या एवढी संख्या संपूर्ण न्यूझीलंड संघाला मिळविता आली नाही.
हे देखील वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार
गुरबाझच्या ८० धावा (Afghanistan Vs New Zealand)
न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणात नावाजलेला संघ म्हणून ओळख असलेल्या न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानच्या सलामीवीरांचा सोडलेले झेल या पराभवाचे कारण ठरले. अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी १०३ धावांची भागीदारी रचली. हा अफगाणिस्तानसाठी विजयाचा पाया ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नंतर चांगली कामगिरी केली. मात्र, अफगाणिस्तानच्या संघाने गुरबाझच्या ८० धावा (५६ चेंडू) व इब्राहिम झद्रानच्या ४४ धावांच्या जोरावर २० षटकांत सहा गडी गमावत १५९ धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व मॅथ्यू हेन्रीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!
न्यूझीलंडच्या संघाने शरणांगती पत्करली (Afghanistan Vs New Zealand)
१६० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फिनले अॅलन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाजांचा बाद होण्याचा क्रम सुरू झाला. अफगाणी गोलंदाजांच्या माऱ्या समोर न्यूझीलंडच्या संघाने शरणांगती पत्करली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत केवळ ७५ धावाच जमवू शकला. अफगाणिस्तानच्या फझलहक फारुखी व राशिद खानने प्रत्येकी चार फलंदाज बाद केले.