Ahilyanagar | अहिल्यानगरमध्ये वृद्धाचा निर्घृण खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0

Ahilyanagar | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आणखी एका खुनाच्या घटनेने संपूर्ण नगर हादरले आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारात साईबन समोरील मोकळ्या पटांगणात ७५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नक्की वाचा: इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा

ज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

बापू नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरुण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते शांत आणि साधे जीवन जगणारे म्हणून परिसरात ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मोहन बापू शिंदे यांनी रविवारी (ता. १५) पहाटे फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी

घटना कशी उघडकीस आली?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (ता. १३) दुपारी दोन ते शनिवारी (ता. १४) रात्री १०.४१ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी. निंबळक गावच्या शिवारातील विळद बायपास जवळ साईबन समोरील मोकळ्या पटांगणात बापू शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी संशयास्पद परिस्थितीत मृतदेह दिसून येताच पोलिसांना माहिती दिली.

प्राथमिक तपासात काय समोर आले?

अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण व बोथट वस्तूने शिंदे यांच्या डोक्यावर वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि झटापटीचे काही पुरावेही आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांचा तपास वेगात

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून नमुने संकलित केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून विविध अंगांनी तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हे पहा – बुधवार पेठेत पोलिसांचं सर्च ऑपरेशन का? पहा सर्वात मोठा खुलासा

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here