Ahilyanagar : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास

Ahilyanagar : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास

0
Ahilyanagar : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास
Ahilyanagar : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास

Ahilyanagar : आमदार संग्राम जगताप आयोजित महाराष्ट्र केसरी माती, गादी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र अहिल्यानगर शहरातील तालमींचाही एक वैभवशाली इतिहास राहिला आहे. अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव यांनी त्यावर टाकलेला प्रकाश…

नगर शहराचं (Ahilyanagar) लक्ष शरीर संवर्धनाकडे फार ऐतिहासिक (Historical) काळापासून आहे. अहमदनगर शहर स्थापन करणाऱ्या अहमदशहाला मर्दानी खेळाची फार आवड होती. त्यामुळे नगर शहरांतील तालमीची (Talim) परंपरा तेव्हांपासूनची आहे. अशा तालमीत तरवारीचे पट्टे, बोथाटी, वगैरे खेळ शिकविण्याचा प्रघात असे. युरोपमध्ये मध्ययुगीन काळांत ज्याप्रमाणे वीरामध्ये द्वंद्वयुद्ध करण्याचा प्रघात होता. ती प्रथा अहमदशहाच्या कारकीर्दीत चालू होती. क्षुल्लक कारणावरूनही द्वंद्व युद्धाचे एकमेकांस आव्हान देऊन भर रस्त्यांत असे तलवारीची द्वंद युद्धे होत व निष्कारण मुडदे पडत. त्यामुळे ही प्रथा हळूहळू बंद पडली. तेव्हां पासून शहरांत मोहोल्या- मोहल्यांत तालमीच्या संख्येत वाढ होऊन कुस्तीगीर मल्ल तयार करण्याची परंपरा वाढत गेली. मराठा अमदानीतही तीच प्रथा होती. मुसलमानी किंवा मराठी जवानाची सैन्यात भरती करण्याची स्थाने म्हणजेच या तालमी होत.

नक्की वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य

तालमीकडे पाहण्याचा इंग्रजांचा दृष्टीकोन असायचा संशयप्रस्त

परंतु मराठेशाही नष्ट झाल्यानंतर या तालमीकडे पाहण्याचा इंग्रजांचा दृष्टीकोन संशयप्रस्त असल्यामुळे तलवार, बोथाटी वगैरे, चालविण्याचेः शिक्षण तर बंद पडलेच, परंतु लाठी, काठी, मल्लखांब, जोर, बैठक, एवढ्यावरच तालमीचे वस्ताद समाधान मानूं लागले. इकडे राजाश्रयहि नाहीं, व लोकाश्रयही तितका नाहीं. अशा परिस्थितीत या तालमी चालत. त्यामुळे समाजांतील बुद्धिमान लोकांचं या संस्थेकडे दुर्लक्ष झालें.

अवश्य वाचा : सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

तरुणांत व्यायामाची व तालमीची आवड उत्पन्न करण्याची आवश्यकता (Ahilyanagar)

सन १९०६-१९०७ च्या राजकीय राष्ट्रीय चळवळीमुळे इंग्रज सरकारचा दृष्टिकोन जास्तच संशयग्रस्त झाल्यामुळे, किंबहुना शाळा कॉलेजांतून असलेल्या तालमीतूनही विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या तालीमबाजीचं शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसाच असल्यामुळे तालमीचा व बलोपासनेचा शोक कमी होऊं लागला. परंतु राष्ट्रोन्नतीच्या काळात सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी या संस्थेकडे बुद्धीच्या उपासनेबरोबरच शरीर व बलाचे उपासनेकडे लक्ष देणे आवश्यक वाटल्यावरून तालमीची व कुस्तीगीरांची संघटना करण्याकडे व व्यायाम प्रचारक मंडळे स्थापून तरुणांत व्यायामाची व तालमीची आवड उत्पन्न करण्याची आवश्यकता वाटू लागली.

Ahilyanagar : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास
Ahilyanagar : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास


नगर शहरांत प्रमुख तालीम म्हणजे नालेगावमधील सातपुते तालीम ही प्रसिद्ध आहे. नगरचे एकेकाळचे प्रसिद्ध राजकीय व सामाजिक पुढारी बाळासाहेब देशपांडे यांनाही स्वतःला तालमीची मोठी आवड असल्याने सन १९०७ मध्ये राघोबा शेळके, बापूसाहेब सराफ वकील यांच्या साहाय्याने सध्याची सातपुते तालीम बांधण्यांत त्यांनी पुढाकार घेतला.


या तालमींत बाळासाहेब स्वतः येत, बापूसाहेब सराफ वकील हेही याच तालमीतून तयार झालेले, शेळके मास्तर हे बरीच वर्षे अहमदनगर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये तालीम मास्तर होते व त्यांनी शाळेतून व सातपुते तालमीतून अनेक शिष्य तयार केले. त्यांपैकी काही सर्कसमध्येही जाऊ शकले.


यावरून शेळके मास्तरांचे शिक्षण कसे होते याचा प्रत्यय येईल. नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेमधून तयार होऊन आलेले मामा देशपांडे यांनीही शाळेची तालीम बऱ्याच लौकिकांस चढविली. त्या तालमीचा शाळेचे माजी विद्यार्थीही फायदा घेतात. त्यामुळे पिंगळे वस्ताद, डॉ. केतकर वगैरे व्यायाम पटू वाडियापार्कमध्ये व्यायाम प्रसारक मंडळ स्थापन करूं शकले.


आज नगर शहरांत आजचे किसनसिंग हे जंगुभाई वस्ताद तालमीतील पहिलवान होत. हे नगर बाहेर जाऊन कुस्त्या जिंकू शकले. सन १९५४ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची अशी तालमीची संघटना झाली. त्यातर्फे पुण्यास कुस्तीगीर परिषद भरली व त्याचे अध्यक्ष नामदार भाऊसाहेब हिरे व स्वागताध्यक्ष आमदार नामदेव मोहिते होते. या परिषदेचे उद्घाटन, मंत्री नामदार मोरारजीभाई देसाई यांनी केले. या परिषदेत जी संघटना झाली त्या संघटनेने नेमलेल्या कार्यकारी मंडळावर अहिल्यानगर जिल्ह्यातर्फे किसनसिंग पहिलवान यांची निवड केली.


या संघटनेचा आणखी एक फायदा म्हणजे जे मोठ्या शहरांत किरकोळ दंगे, छुपेहल्ले’ सुरेमारी वगैरे यापासून जनतेचे संरक्षण करणे. सरकारची पोलीस संघटना व होमगार्ड संघटना यांच्या बरोबरच या तालीम संघांतील सदस्यांची सरकारला मदत व्हायची. या दृष्टीनें नगरची शाखा वरील संघटनेस जोडून घेतली असल्यामुळे तशाच प्रकारचे कार्य नगर शाखेकडून व्हायचे. नगरमधील पहिलवान या कामात हिरीरीने सहभागी होत.
नगरमध्ये रामचंद्र पहिलवान, तुळसा घिसाडी, नाना ताडीवाले, लालू काळू बागवान आदी नामांकीत पहिलवान होऊन गेले. त्यांची नावे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रसिद्ध होती. त्यांनी मोठमोठ्या शहरांत जाऊन कुस्त्या केल्या. शहरांतील प्रमुख तालमीस त्या त्या तालमीचे वस्तादावरूनच नांवे पडली आहेत. नगरमधील छबूराव लांडगे पहिलवान प्रसिद्ध मल्ल. दख्खनचा कालचित्ता म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांनी बाहेर गावीही मोठ्या कुस्त्यांत यश मिळविले.


अहिल्यानगर शहरांतील तालमी

१. बाबाजी सातपुते तालीम, नालेगाव
२. नाना पाटील तालीम, नालेगाव
३. जंगूभाई वस्ताद तालीम, तोफखाना
४. सिद्धेश्वर आखाडा, तोफखाना
५. अमीरसाहेब वस्ताद तालीम, सर्जेपुरा
६. धडवाई वस्ताद तालीम, दाणेडबरा
७. निजाम वस्ताद तालीम, मंगळगेट
८. दादाभाई घडवाई तालीम, झेंडीगेट
९. समशेरखा वस्ताद तालीम, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ
१०. मौलवी वस्ताद तालीम, गंजबाजार
११. बाबुराव सोनार वस्ताद तालीम, खिस्तगल्ली
१२. अमदुभाई वस्ताद तालीम, गौळीडबरा
१३. तवकल वस्ताद तालीम, मंगळवार बाजार
१४. तुकाराम पटवेकर वस्ताद तालीम, कौठी कारंजा
१५. नारायण गवंडी वस्ताद तालीम, माळीवाडा


एके काळी महाराष्ट्रातील नामांकीत मल्ल घडवण्यासाठी याच तालमीतून प्रशिक्षण मिळे. त्यामुळे १९६०-७० पर्यंत कुस्तीगिरांमध्ये अहिल्यानगर महाराष्ट्रात अग्रक्रमावर होते.


डॉ. संतोष यादव
इतिहास अभ्यासक