
Ahilyanagar Digital Mahakumbh 2025 : नगर : नवनवीन उपक्रम अन् संकल्पनांच्या माध्यमातून कायमच अहिल्यानगरचा (Ahilyanagar) नाव लौकिक वाढवणाऱ्या ‘आय लव्ह नगर’ (I Love Nagar) या नगरकरांच्या हक्काच्या व्यासपीठाच्या पुढाकारातून ‘अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ २०२५’ (Ahilyanagar Digital Mahakumbh 2025) या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवारी (ता. ८) अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृह येथे आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अहिल्यानगरच्या डिजिटल पर्वाचा आरंभ
‘अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ २०२५’च्या निमित्ताने राजकारण, पत्रकारिता, मनोरंजन, फॅशन, डिजिटल मीडिया आणि फायनान्स अशा विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांना अहिल्यानगरमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते, ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल पद्धतीने अहिल्यानगर डिजिटल महाकुंभाचे उद्घाटन झाले. यशाचा कानमंत्र देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार स्वप्नील जोशी, ‘व्हायरल’ कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे, सुप्रसिद्ध फायनान्स एज्युकेटर सी.ए. रचना रानडे, लोकप्रिय युथ लीडर आमदार सत्यजीत तांबे, फॅशन अँड लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर उर्मिला निंबाळकर, अभिनेत्री हेमल इंगळे आणि पत्रकार अभिजीत कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत यशाचा प्रवास उलगडून सांगितला.
नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितला आयोजना मागचा उद्देश (Ahilyanagar Digital Mahakumbh 2025)
या प्रसंगी नरेंद्र फिरोदिया यांनी अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ आयोजित करण्याचा उद्देश सांगितला. यावेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हा अभिनव डिजिटल उपक्रम, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना मार्गदर्शक ठरणार असल्याची भावना व्यक्त केली.

‘आर्थिक रचना’ या सेशनमध्ये सीए रचना रानडे यांनी यशाचा कानमंत्र सांगितला. ‘गाव ते ग्लोबल’ मधून युथ लीडर आमदार सत्यजीत तांबे यांनी, ‘परफेक्ट क्लिक’ मध्ये सुप्रसिद्ध फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि Canon EOS Influencer ऐश्वर्या नायक यांनी, ‘स्थळ अहिल्यानगर with अथर्व सुदामे’मध्ये ‘स्थळ पुणे’ फेम अथर्व सुदामे याने BBC मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ‘सोपी गोष्ट’मध्ये, ‘Unfiltered Urmila’ मध्ये फॅशन इन्फ्लूएन्सर उर्मिला निंबाळकर हिने ‘कोल्हापुरी ते कलाकारी with Heymal’ मध्ये हेमल इंगळेने तर सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार स्वप्नील जोशी यांनी ‘सोशल दुनियादारी विथ स्वप्नील’ मध्ये आपले विचार मांडले. स्टॅन्ड-अप कॉमेडियन फातिमा आयेशाने उपस्थितांना खळखळून हसवले.
‘द व्हायरल नगरकर’ या सेशनमध्ये अहिल्यानगरचे व्हायरल स्टार्स, आपली आजी फेम सुमनताई धामणे, रिलस्टार्स ऋषिकेश हराळ, गौरव मालोदे, विराज अवचिते आणि महेश काळे यांनी आपला जीवनप्रवास सांगत अहिल्यानगरकरांची मने जिंकली.
पहिल्याच अहिल्यानगर डिजिटल महाकुंभात सहभागी होणाऱ्या एका भाग्यवंताला ‘लकी ड्रॉ’मध्ये आयफोन १७ जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. त्यात जामखेड येथील रहिवासी सार्थक कोठारी नशिबवान विजेता ठरला. लोकप्रिय आर.जे. शोनाली यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सोहम गृप डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भंडारी व खास रे टीव्हीचे संस्थापक संजय कांबळे यांनी मुलाखतीद्वारे मान्यवरांना बोलते केले. अहिल्यानगरमध्ये प्रथमच आयोजित या डिजिटल महाकुंभाला नगरकरांचा अगदी उदंड प्रतिसाद मिळाला.


