
Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) कामकाजात गती आणण्यासाठी आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी महापौर ज्योतीताई गाडे (Mayor Jyoti Gade) यांनी जुन्या महापालिकेतील विविध विभागांना अचानक भेट दिली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छतेच्या निकृष्ट स्थितीबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. महापौर ज्योतीताई गाडे यांनी आपल्या वडिल कै. शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या कार्यशैलीप्रमाणेच तळागाळात जाऊन अधिकाऱ्यांकडून प्रश्न विचारत सखोल माहिती घेतली. त्यांच्या थेट संवादशैलीमुळे अधिकाऱ्यांनाही आपल्या कामाची पुन्हा तपासणी करावी लागली. पाहणीदरम्यान महापौरांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “आपण नागरिकांना स्वच्छतेचे धडे देतो, पण आपल्या स्वतःच्या कार्यालयातच अस्वच्छता असणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. दोन दिवसांत जुन्या महापालिकेतील सर्व विभागांची स्वच्छता करण्यात यावी.”
नक्की वाचा: डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

नागरिकांचा विश्वास टिकवणे ही आपली जबाबदारी
त्यांनी पुढे सांगितले की, “महापालिकेच्या प्रतिष्ठेला आणि नागरिकांच्या अपेक्षांना साजेसे कामकाज झाले पाहिजे. नागरिकांचा विश्वास टिकवणे ही आपली जबाबदारी आहे.” महापौर ज्योतीताई गाडे यांनी जन्ममृत्यू विभागाची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या म्हणाल्या “महापालिकेत दाखल्यांसाठी नागरिकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. हा त्रास संपवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा. सर्व रेकॉर्ड संगणकीकृत करा, जेणेकरून दाखले तातडीने देता येतील.”त्यांनी सावेडी उपनगरात स्वतंत्र दाखला कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि नागरिकांसाठी ई-सेवा प्रणाली सुरू करण्याची कल्पना मांडली. महापौरांनी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सतीश राजुरकर यांच्याकडून शहरातील लसीकरण आणि आरोग्यसेवा याबाबत सविस्तर माहिती घेतली.
अवश्य वाचा: नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’ चित्रपटातील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

103 आशा सेविका कार्यरत (Ahilyanagar Municipal Corporation)
राजुरकर यांनी सांगितले की, “शहरात 103 आशा सेविका कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली जाते. सध्या शहरात 250 लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत.” त्यांनी पुढे नमूद केले की, “केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत नागरिकांची तपासणी नियमित सुरू आहे.” महापौर गाडे यांनी विवाह नोंदणी विभागाचीही पाहणी केली आणि नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले.
हे वाचा : होमगार्डला मारहाण; भिंगारमधील दोघांवर गुन्हा दाखल

जळालेल्या सभागृहाची पाहणी
महापौरांनी जुन्या महापालिकेतील जळालेल्या सभागृहाचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, “शहराच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असलेले हे सभागृह पुनर्बांधणीसाठी आवश्यक नियोजन करा. या ठिकाणी आधुनिक सुविधा असलेले बहुउद्देशीय सभागृह उभारण्याचा विचार केला जाईल.”या पाहणीवेळी नगरसेवक ऋग्वेद गंधे, संतोष गांधी, महावीर कांकरिया, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


