
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिकेत (AMC) ३१ डिसेंबर २०२३ पासून प्रशासक राज आहे. अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची (Ahilyanagar Municipal Corporation Election) मागील दोन वर्षांपासून स्थानिक राजकीय नेते वाट पाहत होते. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज (ता. १५ ) पत्रकार परिषद घेत राज्यातील अहिल्यानगरसह २९ महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार अहिल्यानगर शहरातील १७ प्रभाग व ६८ नगरसेवकपदांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
अवश्य वाचा: लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत : विखे पाटील
मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकी संदर्भातील कामे सुरू केली आहेत. अहिल्यानगर महापालिकेत मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे. या कालावधीत डॉ. पंकज जावळे व यशवंत डांगे यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. महापालिकेत प्रशासक असल्याने अनेक प्रशासकीय अडचणी येत होत्या. अखेर आता निवडणुका होणार असल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्रभाग निहाय आरक्षणेही जाहीर केल्याने इच्छकांनी गाठीभेटींचे सत्र सुरू केले आहे.
नक्की वाचा : वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका
महायुती होणार का? (Ahilyanagar Municipal Corporation Election)
राज्यात महायुतीची सत्ता आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एक नगरपंचायतची निवडणूक स्वतंत्रपणे लढले. तर महाविकास आघाडीतही काही जागी बिघाडी पहायला मिळाली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे महापालिका निवडणुकीचे निर्णय माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे निर्णय आमदार संग्राम जगताप तर शिवसेनेचे निर्णय माजी नगरसेवक अनिल शिंदे घेत आहेत. मागील वर्षांत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा परिणाम महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या राजकीय समीकरणावर होईल का? की वरिष्ठ नेत्यांच्या दबावातून स्थानिक राजकीय समीकरणे ठरतील यावर अहिल्यानगर शहरातील महायुतीचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) मोठ्या संख्येत नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. ठाकरे गटाकडे सध्या केवळ एकच नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात तर एकही नगरसेवक नाही. माजी महापौर अभिषेक कळमकर हे या पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण या एकमेव नगरसेवक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नवीन चेहरे दिसण्याची चिन्हे आहेत.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकी करिता सर्वच पक्षांनी मोट बांधायला सुरूवात केली असताना सर्व पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या आहेत. आजी माजी नगरसेवकांनी यामध्ये मुलाखती दिल्या आहेत. मागील २०१८च्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेला २४, राष्ट्रवादी काँग्रेसला १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसप ४, सपा १ तर अपक्ष २ असे संख्याबळ होते. यंदा या संख्येत बदल होणार हे निश्चित झाले आहे. कारण, या पंचवार्षिकमध्ये साधारणतः ५ नगरसेवकांनी वेगळी भुमिका घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप अशी एकत्रितपणे युती होऊन समान जागांवर लढण्याची तयारी सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. तर शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवताना काही पक्षांच्या आघाडीची शक्यता सुद्धा आहे. अपक्ष सुद्धा त्यांच्या समवेत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१८साली बसपचे ४ नगरसेवक हे शिवसेनेला मानणारे होते. पण ते बसपच्या चिन्हावर निवडणूक आले. त्यामुळे आताच्या निवडणुकीत हे बसपचे चार जण धरून शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाकडून निवडणूक लढविणार असले तरी एक -दोन जागेत बदल होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेच्या २४ व बसपचे ४ असे एकून २८ नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक उद्धव ठाकरे गटाकडे यामध्ये योगीराज गाडे व अशोक बडे हे आहेत. तर उर्वरित २६ पैकी सुभाष लोंढे व पुष्पा बोरुडे यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही संख्या आता २४वर आली आहे. ही २४ संख्या धरताना यामधील बसपाचे चार नगरसेवक धरले आहेत. शिवसेना व बसपची २८ची संख्या होती त्यात चार जण पुन्हा बाजूला पडले आहेत. त्यामुळे संख्या २४वर येताना सर्वाधिक मोठा पक्ष असलेली शिवसेना यामध्ये फुट पडली असून ४ बसपाचे नगरसेवक जे पूर्वी शिवसेनेत होते ते धरून आता संख्या २०वर आली आहे. सारिका भुतकर यांचे नगरसेवकपद अर्ज छाणणीत बाद झाले होते. त्यामुळे ही संख्या १९वर आली आहे.
सारिका भुतकर यांच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जाधव यांनी विजय मिळवला. त्यामुळे शिवसेनेची एक जागा कमी झाली होती. अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे पद रद्द झाल्यावर तेथे पोट निवडणूक झाली. या पोट निवडणुकीत भाजपच्या प्रदीप परदेशी यांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजपचे दोन नगरसेवक वाढले.
शिवसेना सर्वात मोठा पक्ष मात्र महापौर भाजपचा
२०१८मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीबाबतच्या सर्वेक्षणाचे सर्वांचेव अंदाज फोल ठरवीत नगरकरांनी शिवसेनेला महापालिकेत प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून पसंती दिली होती. शिवसेनेने सर्वाधिक २४ जागा मिळविल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने १८ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले. ‘फोर्टी प्लस’चा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेत अहिल्यानगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद मिळविले. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळविता आली नाही. तर बसपचे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले. समाजवादी पक्षाच्या एकाला प्रथमच नगरसेवक होण्याची संधी मिळाली. भाजपने मोठ्या जोषात निवडणूक स्वतंत्र लढवली. मात्र, त्यात माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र व सून दीप्ती यांचा पराभव झाला. प्रभाग १४ मधून माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला. कोतकरांनी भाजपला साथ देताच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावला महापालिका निवडणुकीत भुईसपाट व्हावे लागले होते. नगरसेवक असलेले शिवसेनेचे उमेदवार दिलीप सातपुते पराभूत झाले. त्यांची त्यांच्या प्रभागात अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली होती.
यांना बसला होता पराभवाचा धक्का
२०१८च्या निवडणुकीत माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गीतांजली काळे, शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, शारदा ढवण, दीप चव्हाण, महेश तवले, उषा नलावडे, नसीर शेख, इंदरकौर गंभीर, वीणा बोज्जा, अनिता राठोड, सुरेश तिवारी, नंदा साठे, सुनील कोतकर आदींना पराभवाचा धक्का बसला होता.
२०१८साली पक्ष निहाय बलाबल
शिवसेना २४
भाजप १४
राष्ट्रवादी काँग्रेस १८
काँग्रेस ५
बसप ४
सपा १
अपक्ष २


