
भाजप ३२ तर राष्ट्रवादी ३४ जागांवर लढणार; शिवसेना शिंदे गट युतीबाहेर
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी (Ahilyanagar Municipal Corporation Election) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (Ajit Pawar NCP) यांची अधिकृत युती जाहीर झाली असून, भाजप ३२ तर राष्ट्रवादी काँग्रेस ३४ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारस्कर (Sampat Barskar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?
यावेळी बोलताना अनिल मोहिते म्हणाले की,
शिवसेना शिंदे गटाने अवाजवी जागांची मागणी केल्यामुळे त्यांना युतीत सामावून घेणे शक्य झाले नाही. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला असून त्याबाबत संबंधितांना वेळेत निरोप देण्यात आला होता. मात्र, शिंदे गटाने पत्रकार परिषदेत ज्या जागांची मागणी मांडली, त्या आमच्यासाठी मान्य करणे शक्य नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने केलेला अंतर्गत सर्वेक्षण अहवाल वरिष्ठ पातळीवरही तपासण्यात आला असून, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मोहिते यांनी सांगितले. विद्यमान नगरसेवकांनाही उमेदवारी देण्यात आली असून, ज्यांना डावलण्यात आले आहे ते सर्वेक्षणात कमी पडले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलेले नाही. कोणी असा दावा करत असेल तर त्यांनी तशी यादी सादर करावी,” असे खुले आव्हानही मोहिते यांनी दिले.
अवश्य वाचा: महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा
प्रभाग क्र. ४ मध्ये उमेदवार नाही (Ahilyanagar Municipal Corporation Election)
प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, या प्रभागातून निवडणूक लढवण्याची इच्छा दोन्ही पक्षांकडे कोणत्याही इच्छुक उमेदवाराने व्यक्त केलेली नाही.
यावेळी संपत बारस्कर म्हणाले की, निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे याला सामोरे गेलेच पाहिजे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरच्या विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुती चा झेंडा महापालिकेवर फडकेल असेही संपत बारस्कर यांनी सांगितले.
दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत
प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचेही मोहिते यांनी स्पष्ट केले.
बंडखोरांना इशारा
ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना समजावले जाईल. मात्र त्यांनी ऐकले नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–राष्ट्रवादी युतीमुळे नगरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


