Ahilyanagar News : गणेशोत्सवा (Ganeshotsav) मागोमाग येणाऱ्या नवरात्र उत्सवाची (Navratri) तयारी नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगरच्या (Burhannagar) तुळजाभवानी देवी मंदिरात (Tuljabhavani Temple) सुरु झाली आहे. २२ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीची सीमोल्लंघनाची नवी पालखी बनवण्यासाठी सुमारे २०० वर्ष जुना असलेला पालखीचा ऐतिहासिक दांडा (Historical pole of the palanquin) रविवारी (ता.२४) ऑगस्टला बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना करण्यात आला.
नक्की वाचा : ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे अहिल्यानगरमध्ये उद्घाटन
भगत परिवाराच्या वतीने पौराणिक दांड्याची विधिवत पूजा (Ahilyanagar News)
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर बुऱ्हाण नगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे पुजारी भगत परिवाराच्या वतीने या पौराणिक दांड्याची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर तो बुऱ्हाणनगर हून राहुरीच्या सुतार लोहारांकडे आई राजा उदो उदो च्या गजरात रवाना करण्यात आला. राहुरीमध्ये या ऐतिहासिक दांड्याला नवी पालखी तयार करून लावण्यात येते. यावेळी बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे प्रमुख पुजारी अॅड.विजय भगत व दुर्गा भगत, अॅड.अभिषेक भगत, कुणाल भगत, राजेंद्र भगत आदींसह भगत परिवार व भाविक उपस्थित होते.
अवश्य वाचा : कोकणच्या लाल मातीवर रेखाटली ‘दशावतार’ अक्षरे; प्रेक्षकांकडून आगळीवेगळी मानवंदना
अॅड.विजय भगत यावेळी म्हणाले, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानीदेवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजारांहून अधिक वर्षांपासून बुऱ्हाण नगरच्या भगत कुटुंबाच्या तुळजाभवानी देवी मंदिराकडे आहे. दरवर्षी ही पालखी तुळजाभवानी देवीच्या दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी नगरमधून तुळजापूरकडे जात असते. या पालखीचा दांडा हा २०० वर्षाचा जुना आहे. दरवर्षी फक्त पालखीचा पाळणाच नव्याने बनवला जातो. नव्या पालखीसाठी लागणारे सर्व साहित्य भगत परिवार राहुरीच्या सूताराला देत असते. वंशपरंपरेने एक हजार वर्षापासून भगत कुटुंबीय ही परंपरा जपत आहे.
अभिषेक भगत काय म्हणाले (Ahilyanagar News)
अॅड.अभिषेक भगत म्हणाले, नवरात्री उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीच्या पालखीचा नवा पाळणा बनवून झाल्यावर राहुरी येथून तुळजाभवानी देवीच्या पालखी सोहळ्याला ७ सप्टेंबर पासून सुरवात होत आहे. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील ४० गावांना सालाबादप्रमाणे जाऊन नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी देवीच्या या मंदिरात येते. येथून ही पालखी श्रीक्षेत्र तुळजापूर कडे रवाना केली जाते. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी साक्षात तुळजाभवानी देवीच या पालखीत विराजमान होत असल्याने या पालखीत देवीची कोणतीही मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही. ज्या गावांमध्ये ही पालखी जाते, त्याठिकाणी भव्य यात्रा भरवण्यात येते. हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.