Ahmednagar Politics | नगर (Ahmednagar) जिल्हा जसा सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांसाठी ओळखला जातो, तसा अस्सल ग्रामीण भागाच्या राजकारणासाठी ही ओळखला जातो. एकीकडे भारतात सर्वत्र दिवाळीचा गोड फराळ भरवून जुनी कडू नाती विसरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील दिवाळी फराळ कार्यक्रम हा नगरचा राजकीय (Ahmednagar Politics) गुऱ्हाळाचा ठरला.
पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व विधान परिषदेतील भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या दिवाळी फराळापासून राजकीय डाव प्रति डावांची खेळी रंगताना दिसली. या राजकीय फराळांचे लक्ष्य विखे गट ठरत असल्याचे बोलले जात आहे.
नक्की वाचा : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी
कुरघोड्या
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे व तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे या भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता. या पराभवाचे शल्य अजूनही या दिग्गजांच्या मनात घर करून आहे. या पराभवाच्या शल्यातूनच सध्याच्या राजकीय खेळ्या खेळल्या जात असल्याची चर्चा आहे.
पवारांचा शब्द अन् लोकसभेची तयारी
कोविड काळात आमदार नीलेश लंकेच्या नावाचा राज्यभर बोलबाला झाला. नीलेश लंकेंकडे राष्ट्रवादी काँग्रेस ‘मास्क लिडर’ म्हणून पाहू लागले. यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लंकेंना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द दिला. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या डॉ. सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. पवार व विखे कुटुंबाचे वैर सर्वश्रृत आहे. विखेंना नगर लोकसभा मतदार संघात विरोधक देण्यासाठी शरद पवार आग्रही असतात. २०१९च्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. मात्र, आता त्यांनी लंकेंना बळ देण्याचे ठरविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यावर लंके हे अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे शरद पवार गट लंकेंना आपल्या गटात घेण्यास उत्सुक आहे. त्यांना त्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुदतही दिली होती.
हे देखील वाचा : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र
राम शिंदे-नीलेश लंकेंची जवळीक
पवारांचा शब्द मिळाल्यापासून लंकेंनी जिल्ह्याच्या दक्षिणेत विविध प्रश्नांवर आक्रमक धोरण स्वीकारले. लंकेंचे नाव चर्चेत आल्याने विखे गटाच्या रडारवर लंके आले. यातच लंकेंनी राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नावर नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण केले. त्यावेळी पहिल्यांदाच लंके-विखे संघर्ष पहायला मिळाला. विखेंनी नवरात्रोत्सवात दर्शन यात्रा सुरू केल्या, तर लंकेंनीही नवरात्रोत्सवात दर्शन यात्रा सुरू केल्या. या नवरात्रोत्सवात दुखावलेल्या राम शिंदेंनी नीलेश लंकेंच्या वाहनातून प्रवास करत मोहटादेवी दर्शन केले. दिवाळीत राम शिंदेंच्या फराळ कार्यक्रमाला नीलेश लंकेंनी तर नीलेश लंकेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात राम शिंदेंनी उपस्थिती नोंदवत संबंधातील गोडवा द्विगुणीत केला.
हे पहा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे
रोहित पवारांनी साधला निशाणा
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात रोहित पवार-राम शिंदे सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या लंकेंची राम शिंदेंशी जवळीक वाढल्याने रोहित पवारांची नाराजी वाढल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी पारनेरमध्ये येऊन लंकेंना आव्हान देणारे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटींच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे विखेंना लक्ष्य करायला निघालेल्या लंकेंवरच पवारांची नाराजी ओढावली आहे.
हेही पहा : भारत हारताच प्राजक्त तनपुरेंच्या मुलीने फोडला हंबरडा
‘गणेश’चा राजकीय धुराडा
कोपरगाव विधानसभा मतदार संघात २०१९मध्ये भाजपच्या तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांना थोड्या मतांनी पराभव झाला होता. या पराभवात विखेंचा हात असल्याचा आरोप कोल्हेंनी करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कोल्हे कुटुंबाने या पराभवाचा वचपा काढण्याच्या मनसुब्याने रणनीती आखली. विखेंचे विरोधक असलेल्या आमदार बाळासाहेब थोरातांची साथ कोल्हेंना मिळाली. विखेंना शह देण्यासाठी लंकेंही थेट गणेश कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभांत दिसू लागले. यातूनच युवानेते विवेक कोल्हे व लंकेंची मैत्री झाली. या मैत्रीचा गोडवा वाढवण्यासाठी लंकेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात कोल्हेंनी हजेरी लावली. कोल्हे, शिंदे व लंके यांच्या राजकीय फराळाची सध्या जोरदार चर्चा आहे.
कर्डिलेंनी साधले
विधानसभेतील पराभवानंतर विखेंवर नाराज असलेल्या शिवाजी कर्डिलेंनी नंतर मात्र, विखेंशी जुळवून घेतले. यात राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्यातील राजकारण महत्त्वाचे ठरले. विखेंनीही कर्डिलेंनी घालविलेल्या रुसव्याचे सव्याज फळ नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिले. राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले सहज विजयी होतील, असे दिसत असतानाच विखेंनी पिसाळ पॅटर्न राबवत कर्डिलेंचा आश्चर्यकारकपणे एक मतांनी विजय घडवून आणला. त्यामुळे विखे-कर्डिलेंच्या संबंधातील कडवटपण जाऊन दिवाळी फराळातील गोडवा आला. कर्डिलेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात विखेंनी आवर्जून हजेरी लावली.
यंदाची दिवाळी राजकीय फटाके व फराळांची ठरली. यात तिखट, गोड दोन्ही चवी होत्या. या फराळाची चमचमीत चर्चा मात्र अजूनही जिल्ह्यात सुरू आहे. राज्यातील प्रत्येक नेत्याने फराळ कार्यक्रम घेतले. मात्र, चर्चा झाली ती राम शिंदे, नीलेश लंके व शिवाजी कर्डिले यांच्या फराळ कार्यक्रमाची. हा दिवाळी फराळ कार्यक्रम जिल्ह्यातील आगामी निवडणुकांतील राजकीय खेळींची नांदी ठरण्याची शक्यता आहे.