
AI Wild Netra : नगर : बिबट प्रवण क्षेत्रात (Leopard Area) वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे (Forest Department) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे वनविभागातर्फे ‘एआय वाईल्ड नेत्र’ (AI Wild Netra) ही सौरउर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बिबट्याचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांना तत्काळ सावध करणे शक्य होणार आहे.
नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा
कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्यास सायरनद्वारे इशारा
वनपरिक्षेत्र कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या कामरगाव येथे ही यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेत ‘ॲडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन’ व ‘डिप लर्निंग’ या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. बिबट या वन्यप्राण्याचा डेटाबेस या उपकरणात जतन करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्यास ही यंत्रणा तत्काळ ॲक्टिव्हेट होऊन सायरनद्वारे नागरिकांना धोक्याचा इशारा देते. यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना करणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय काम करते.
अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
येथील परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित (AI Wild Netra)
बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागास तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव येथील मुरलीनगर व खंडोबा मंदिर परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
या प्रणालीमुळे केवळ सायरन वाजत नाही, तर बिबट्यांच्या वर्तवणुकीचा अचूक डेटाही वनविभागाला उपलब्ध होणार आहे. बिबट-मानव संघर्ष व्यवस्थापनात ही ‘एआय’ आधारित यंत्रणा अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.


