नगर : मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर (Ajay Baraskar) यांची काही दिवसांपूर्वी गाडी जाळण्यात आली होती. त्यानंतर आता बारस्कर आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपला ठिय्या घातला असून आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळाले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओसरीवर बसले होते. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
नक्की वाचा : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’;शरद पवारांचे सूचक विधान
अजय महाराज बारस्कर पोलिसांच्या ताब्यात (Ajay Maharaj Baraskar)
अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे आषाढीच्याच दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाल्याचं पाहायला मिळालं. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलीस घेत आहेत. अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने ही नेमकी जळाली की जाळली, कोणी जाळली आणि का जाळली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अवश्य वाचा : देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार;तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार
अजय महाराज बारस्कर यांची पोलिसांत तक्रार (Ajay Maharaj Baraskar)
आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ बारस्कर यांनी फेसबुकवरून व्हायरल केला होता. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या ६५ एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. गाडी जळाल्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत १ लाखांचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आले आहे.
बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, येथेही त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले असून आपणही मराठवाड्यातील सर्वच युवकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.