
नगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पार्थिवावर बारामतीमधील(Baramati) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आज अंत्यसंस्कार (funeral) पार पडले. यावेळी पार्थ आणि जय पवार या दोघा पुत्रांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या प्रसंगी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील राजकीय पक्षांचे नेते याप्रसंगी उपस्थित होते.अंत्यसंस्कारावेळी कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला त्यांनी ‘परत परत या अजित दादा परत या’ अशी घोषणाबाजी केली.
अजित दादा यांचे पार्थिव सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. बारामतीकरांनी काळजावर दगड ठेवत शेवटचं दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून दादांची अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे नेण्यात आली, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूल मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंच्या संख्येने जनसागर लोटल्याचं पाहायला मिळाला. पार्थ आणि जय पवार या दोघा पुत्रांनी दादांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
नक्की वाचा: अजित पवारांच्या निधनामुळे ‘झेडपी’ निवडणुका पुढे जाणार का? निवडणूक आयोग काय म्हणाले?
नेमकं काय घडलं ? (Ajit Pawar Funeral)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी (ता. २८) सकाळी बारामतीत येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजितदादांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केलं. मात्र सकाळी पावणे नऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याआधीच कोसळलं आणि जाळून खाक झाले.
अवश्य वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Ajit Pawar Funeral)
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या अचानक निधनाने सर्वच जण हादरले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


