नगर : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाल्यानंतर राज्यात आता सत्तास्थापनेला वेग आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील नेतेदेखील आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी करत आहेत. यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
नक्की वाचा : राज्यात थंडीचा जोर वाढणार,हवामान विभागाचा अंदाज काय ?
‘आमची काळजी करायला आमचे आमदार आहेत’ (Ajit Pawar)
अजित पवार आज साताऱ्यातील कराड येथे प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्हाला दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का ?असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना पवार म्हणाले की, “इतरांनी काय बोलायचं ते बोलावं. प्रत्येकाने आपल्याजवळ काय आहे हे पाहायला पाहिजे. आमची काळजी करू नये. आमची काळजी करायला आमचे आमदार, महायुती, माझ्या पक्षासोबत असणारे नेते, कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत,” असं अजित पवार म्हणाले. तसेच निदान दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? जनतेची तशी इच्छा आहे,असं विचारल्यानंतर आमचं आम्ही बघू, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपदावर थेट बोलणं टाळलं.
अवश्य वाचा : ‘पुष्पा २’ ची प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई,’प्री बुकिंगमधून’ कमवले १० लाख डॉलर
‘आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने पुढे जातोय’ (Ajit Pawar)
यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील महिला मतदारांचेही आभार मानले. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याच विचाराने पुढे जात आहोत. आमच्या प्रत्येक फ्लेक्सवर यशवंतराव चव्हाण यांचाच फोटो असतो. आणखी किती दिवस आम्हाला नाव ठेवणार आहात. १९७८ साली जी घटना घडली त्याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का. सगळं सोईचं राजकारण चालत नाही. आम्ही केलं की ते चुकीचं म्हटलं जातं. आम्ही शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांच्याच विचाराने चालत आहोत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.