अकोले: तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारातील प्रवरा नदीपात्रात (Pravara River) बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी मुंबईहून आलेल्या एसडीआरएफ टीमची (SDRF Team Boat) बोट उलटून त्यावरील चौघा जवानांसह एकूण पाचजण पाण्यात पडले होते. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले, तर तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
नक्की वाचा : राजस्थान रॉयल्सने बंगळुरुला मात देत क्वालिफायरमध्ये केला प्रवेश
अर्जुन जेडगुले व सागर जेडगुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू (Akole Boat Accident)
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी (ता.२२) संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा व सिन्नर तालुक्यातील घोलवड येथील आठ ते दहा जण सुगाव बुद्रुक परिसरातील विनायक धुमाळ यांच्या शेतावर मक्याचा मुरघास करण्यासाठी आले होते. दुपारच्यावेळी प्रचंड उकाडा जाणवू लागल्याने दीडच्या सुमारास त्यातील काहीजण वनविभागाच्या नर्सरीजवळील प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. या ठिकाणी नदीपात्रात दगडी बंधारा घालण्यात आला आहे. नेमक्या त्याच ठिकाणी पोहोत असताना अर्जुन जेडगुले (वय १८, रा.पेमगिरी) व सागर जेडगुले (वय २५, रा.घोलवड, ता.सिन्नर) हे दोघेजण पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच ठिकाणी बुडाले.
अवश्य वाचा : पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!
एनडीआरएफची बोट पलटली (Akole Boat Accident)
स्थानिकांच्या मदतीने शोधकार्यानंतर त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला, मात्र अंधार पडेपर्यंत अर्जुन जेडगुलेचा मात्र थांगपत्ता नसल्याने अकोले प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानुसार आज पहाटे एनडीआरएफचे पथक सुगावमध्ये पोहोचले व त्यांनी दिवस उजेडताच शोधकार्य सुरु केले. या पथकातील चौघांसह एका स्थानिकाला सोबत घेत हवेच्या बोटीवरुन बंधार्याजवळ शोध सुरु असताना अचानक बोट पलटली. त्यामुळे त्यावरील पाचहीजण पाण्यात पडले आणि काही क्षणात गायब झाले. या घटनेने संगमनेर व अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सुगावच्या नदीकाठावर तळ ठोकून आहे.