Akshay Kardile | नगर : महाराष्ट्रातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊन अवघे दीड वर्ष होत नाहीत तोच राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. हा मतदारसंघ मागील काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपकडून आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अक्षय कर्डिले हे शिव निर्धार यात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली. तनपुरे यांनी निवडणूक लढण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, त्यांनी आपली राजकीय भूमिका अचानक बदल्याचे सांगितले जात आहे.
हे वाचा – श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

कर्डिले पुन्हा आमदार झाले (Akshay Kardile)
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून मतदारसंघ खेचून आणला होता. पहिल्याच टर्मला ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री झाले. मात्र, ते मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण करण्यात कमी पडल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले हे मतदारसंघात सक्रीय राहिले आणि 2024 ला पुन्हा आमदार झाले. कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांना तब्बल 34 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. मात्र, वर्षभरानंतर शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली निधन झाल्याने मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. ही पोटनिवडणूक लढण्याच्या दृष्टीने प्राजक्त तनपुरे हे तयारी करताना दिसत आहे. मात्र, वर्षभरात काही गोष्ट त्यांच्याविरोधात गेल्या आहेत.
अवश्य वाचा – श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
तनपुरेंनी कारखाना राखला (Akshay Kardile)
राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे. या कारखान्यावर सहाशे कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे. या कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यात माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने विरोधकांचा पूर्ण धुव्वा उडवत कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर एक हंगाम झाला आहे. परंतु तनपुरे यांना हा कारखाना सुरू करता आलेला नाही. कर्ज मिळत नसल्याने हा कारखाना सुरू होऊ शकलेला नाही, असे तनपुरे यांनीच अनेकदा जाहीर केलेले आहे. परंतु मोठा गाजावाजा करत कारखाना ताब्यात घेतला पण कारखाना सुरू केलेला नाही, त्याची नाराजी ऊस उत्पादकांमध्ये आहे. कारखाना ताब्यात घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्याचे सांगितले जाते.
तनपुरेंची बदलती राजकीय भूमिका (Akshay Kardile)
प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेवर आपली सत्ता राखलेली आहे. तनपुरे यांनी निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. पण भाजपचे अवघे सात नगरसेवक निवडून आले. तनपुरे यांची होमग्राउंडवर ताकद दिसली परंतु त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे चिन्ह दूर ठेवत अपक्ष निवडणूक लढवावी लागल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.यातच त्यांनी मागील महिन्याभरापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तनपुरेंनी समाजवादी विचारांशी फारकत घेतल्याचे बोलले जात आहे.
तनपुरे व कर्डिलेंची स्वतंत्र यात्रा (Akshay Kardile)
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका सध्या बदलेली दिसत आहे. तनपुरे यांनी नुकतीच मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या डोक्यात अनेकदा भगवी टोपी दिसली, गळ्यातील गमछेही भगवेच होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मानणारी मुस्लिम, दलित व्होट बँकही आहे. राहुरी शहरात, काही गावांत ही व्होट बँक जास्त आहे. परंतु तनपुरे यांच्या बदलेल्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंकेही या निवडणुकीबाबत काही बोलले नाहीत. हा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतो. तेही तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत दिसले नाहीत. तनपुरे यांना न मानणारे पण लंकेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. या यात्रेत लंके हे न दिसणेही तनपुरेंसाठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
हे पहा – द कम्प्लिट मॅन… ‘रेमंड सम्राट’ विजयपत सिंघानियांची एक्झिट!
बारामतीची पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतलाय. त्यामुळे येथील निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. बारामतीप्रमाणे राहुरीत उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्यास प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कोंडी होणार आहे ? सध्या प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका बदलेली आहे. ते पक्षापासून दूर जाताना दिसत आहे. तर भाजपशी जवळीक त्यांनी कशाच्या आधारावर साधली, त्यांना भाजपचे तिकीट मिळेल असे का वाटत होते, भगवी टोपी घालून आपण भाजपला खुष करू शकतो असा विश्वास कशामुळे त्यांना आला, या साऱ्या बाबी अजून पुढे आल्या नाहीत. त्यांच्या बदलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे केडर त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. या साऱ्या बाबीमुळे दोन्ही बाजूंचा पाहुणा म्हणून तनपुरे उपाशी तर राहणार नाहीत ना, अशीच शंका येत आहे.



