Alert : कर्जत : पुणे (Pune) जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्यामुळे खडकवासला आणि इतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून भीमा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. कर्जत तालुक्यातील भीमा नदी (Bhima river) लगतच्या गावांना महसूल प्रशासनाकडून सतर्कतेचा (Alert) इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. यासह तालुका प्रशासनाने गावात काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी सुचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.
अवश्य वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
श्रीगोंदा व कर्जतमधील नदीकाठावरील नागरिकांना इशारा
पुणे जिल्हयात बुधवारी (ता.२४) अतिवृष्टी झाली असून खडकवासला व इतर धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. यामुळे भिमा नदीस दौंड पूल येथे मोठया प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. यासह पुणे व अहमदनगर जिल्हयात पर्जन्यमान सुरु असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. सदयस्थितीत बंडगार्डन पुणे येथे १ लाख ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरुवारी (ता.२५) रात्री दौंड पुल येथे भिमा नदीचा विसर्गामध्ये वाढ होत विसर्ग सुमारे १ लाख ते दीड लाख क्युसेक होण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी ५ वाजता दौंड येथे ७९ हजार ०४३ क्यूसेक वेगाने पाणी वाहत होते. तरी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाकडून देखील देण्यात आला आहे.
नक्की वाचा: खासदार लंकेंनी मांडला एलसीबीच्या भ्रष्टाचाराचा अर्थसंकल्प
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन (Alert)
सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. यासह पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्जत तहसील कार्यालय अथवा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.