काेड रेड…
Alert : नगर : नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत ४७०.२ मिलीमीटर पाऊस (Rain) झाल्याने नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमधून माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गाेदावरी, भीमा पात्रातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या (Bhima River) श्रीगाेंदे, कर्जत, तर गाेदावरी काठच्या काेपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा (Alert) इशारा देण्यात आला. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नक्की वाचा: पाथर्डी तालुक्यात आकाशात फिरली ड्रोन सदृश वस्तू
खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू (Alert)
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. पावसामुळे दौंड पूल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान सुरू आहे. धरण क्षेत्रात संततधार पाऊस अथवा अतिवृष्टी झाल्याास नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे अकोले तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांनाही जिल्हा प्रशासनामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अवश्य वाचा: भरोसा सेलकडून विद्यार्थिनींमध्ये जनजागृती
प्रशासनाने केले आवाहन (Alert)
नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्याासाठी गर्दी करु नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालिन परिस्थितीमध्ये १०७७ या टाेल फ्रीवर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.