नगर : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून नवलच वाटले ना ? मात्र आता ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani chalishitle chor) या नावाचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार यामध्ये एकत्र काम करणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर आऊट (Poster Out) झाले आहे. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे.
२९ मार्चला येणार चित्रपट (Alibaba Ani chalishitle chor)
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आनंद इंगळे अशी मोठी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून नितीन वैद्य, वैशाली लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या २९ मार्चला चाळिशीतले चोर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.
अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ मध्ये नेमके काय ? (Alibaba Ani chalishitle chor)
चित्रपटाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे गुन्हा आहे का आणि हे नेमके हे प्रकरण काय आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार, हे निश्चित दिसत आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे.आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत”.