AMC | नगर : अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) अग्निशमन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना, अग्नी सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी आदींबाबत जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून अग्नी सुरक्षेचे धडे देण्यात आले. प्रत्येक घर, इमारत ती व्यावसायिक असो अथवा निवासी असो, सर्वांनी बांधकाम करताना अग्नी सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना कराव्यात. यातून आगीची घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यअग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ यांनी केले.
नक्की वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश
राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह (AMC)
अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह न्यू आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयात राबविण्यात आला. महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आग लागल्यास तात्काळ करावयाची कार्यवाही, अग्निशामक यंत्रांचा वापर, सुरक्षित रितीने बाहेर पडण्याच्या उपाययोजना याविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी वाहन चालक सिंधू भांगरे, फायरमन शुभम गावडे, दिनेश शिंदे, अविनाश साठे, सागर भिंगारदिवे, तसेच धीरज जावळे व संकेत साठे यांनी मार्गदर्शन केले.
अवश्य वाचा : शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनकडून धर्मवीरगडातील हत्तीमोट बारवेची स्वच्छता
कचरा जाळणे हा गुन्हा (AMC)
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून आगीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर, काटवणात कचरा पेटवू नये. आग लागून हरित क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. निवासी क्षेत्रात असे प्रकार केल्यास यातून आगीची मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच, कचरा जाळणे हा गुन्हा असून, संबंधितावर फौजदारी कारवाई होऊ शकते. आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.