AMC | नगर : अहिल्यानगर महापालिकेतर्फे (AMC) पे अँड पार्क बाबत खासगी यंत्रणेला ठेका देण्यात आला आहे. मात्र, या ठेकेदाराने जिथे मोकळी जागा दिसेल तेथे पे अँड पार्कची पाटी लावून नागरिकांकडून वसुली सुरू केली आहे. या वसुलीच्या नादात संबंधित ठेकेदाराने संरक्षित (कंफर्ट) असलेली केंद्र सरकारची कार्यालये सुद्धा सोडली नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित विभागाने अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिका तसेच पोलीस प्रशासनास पत्र दिले आहे. मात्र, अद्यापही संबंधित प्रशासनाने पे अँड पार्क बाबत दुर्लक्ष केले असल्याने महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवश्य वाचा – पाथर्डीतील शतकी सैनिक स्मृती स्तंभ अज्ञात वाहनाच्या धडकेत जमीनदोस्त
नाशिक येथील संस्थेला ठेका (AMC)
महापालिकेने शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी तब्बल ३६ रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ला मंजुरी देऊन लगेच १ जानेवारीपासून त्यांची अंमलबजावणी देखील सुरू केली. नाशिक येथील दिग्विजय एंटरप्रायजेस या खासगी संस्थेला ठेका देण्यात आला आहे. या संस्थेमार्फत गेल्या तीन महिन्यांपासून ‘पे अॅड पार्क’ ची अंमलबजावणी होत आहे. या माध्यमातून वाहतुकीची, पार्किंगची समस्या मार्गी लागेल, वाहतुकीला शिस्त येईल व महापालिकेलाही उत्पन्न मिळेल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी होण्यापूर्वी स्पष्ट केले होते. महापालिका प्रशासनाने पार्कीग मोबिलिटी प्रा. लि. या खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पार्किंग झोन, नो हॉकर्स झोन, सम-विषम सशुल्क पार्किंग, एकेरी वाहतूक, महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्क आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला. यात १८ प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन करण्यात आले. तर कापड बाजार व नवीपेठ रस्त्यावर एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आला.
नक्की वाचा – वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचे पलायन; वांगदरी ग्रामस्थांचा आरोप
३६ रस्ते व मोकळ्या जागांवर पे अँड पार्कची अंमलबजावणी (AMC)
मात्र, शहरात एकेरी वाहतूक, सम-विषम याची अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. शहरातील ३६ रस्ते व मोकळ्या जागांवर पे अँड पार्कची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली तरी काही रस्त्यांवर ती होताना दिसत आहे. त्यासाठी ठेकेदार संस्थेचे कर्मचारी वाहन चालकांकडून पे अँड पार्कनुसार रक्कम देखील घेत आहेत. मात्र, महापालिकेकडून या पे अँड पार्क च्या पे अंमलबजावणीतून किती उत्पन्न गेल्या तीन महिन्यात मिळाले, हे स्पष्ट नाही. दरम्यान या ठेकेदाराने सावेडी येथील आकाशवाणी केंद्र समोर पे अँड पार्किंगची दुकानदारी मांडली आहे. ही संरक्षित जागा असल्याचे भान महापालिका व संबंधित ठेकेदाराला राहिले, नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.
असे आहेत दर ! (AMC)
पार्किंगसाठी आकारण्यात येणारे प्रतितास शुल्क. दुचाकी ५ रुपये, चारचाकी १० रुपये, टेम्पो २५ रुपये, मिनी बस ५० रुपये, अवजड वाहने (ट्रक, बस, टुरिस्ट बस)-१२० रुपये, खासगी बस (१५ मीटर लांब)-१५० रुपये, पॅरा ट्रान्झिट नॉन डेझिग्नेटेड एरिया १० रुपये. नो पार्किंग, नो हॉकर्स झोनमध्ये पार्किंग केल्यास दंड- दुचाकी (टोविंग) ७४२ रुपये दुचाकी (क्लॅपिंग) चारचाकी (टोविंग) ५०० रुपये, ९८४ रुपये, चारचाकी (क्लॅपिंग) ७४२ रुपये आकारण्यात येत आहेत.