AMC : महापालिकेच्या आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगेंचे नाव वगळले

AMC : महापालिकेच्या आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगेंचे नाव वगळले

0
AMC : महापालिकेच्या आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगेंचे नाव वगळले
AMC : महापालिकेच्या आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगेंचे नाव वगळले

AMC : नगर : शासनाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Health Department) १५ व्या वित्त आयोगाव्दारे प्राप्त झालेल्या निधीतून १६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून महापालिकेचे (AMC) तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे (Dr. Anil Borge) यांचे नाव वगळण्यात आले आहे. डॉ. बोरगे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावाच नाही असे पत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे त्यांना बीएनएसएस १८९ प्रमाणे गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.

नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

१६ लाख ५० हजारांचा अपहार केल्याचा आरोप

शासनाकडून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला १५ व्या वित्त आयोगाव्दारे प्राप्त झालेल्या निधीतून १६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्यावर फेब्रुवारी २०२५ मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. त्यानंतर दोघांना अटकही करण्यात आली होती.

अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

१६ लाख ५० हजार अद्यापही खात्यात जमा नसल्याचे स्पष्ट (AMC)

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश दिले होते. उपायुक्त विजयकुमार मुंडे मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर यांच्या समितीने चौकशी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. यात शासकीय अभियानाच्या खात्यातून १५ लाख व १६ लाख ५० हजार रुपये रणदिवे यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले तसेच १५ लाख रुपये टप्प्याटप्प्याने पुन्हा अभियानाच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले मात्र १६ लाख ५० हजार रुपये अद्यापही खात्यात जमा झालेले नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.


त्यानंतर डॉ. राजूरकर यांनी फिर्याद दिली. रणदिवे यांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा वापर करून १५ व्या वित्त आयोगाकाढून आलेला निधीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ऑनलाईन प्रक्रियेव्दारे १६ लाख ५० हजार रुपये डॉ.अनिल बोरगे यांची मंजुरी घेऊन संगमताने कॅनरा बँकेच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग केले. त्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे. दरम्यान, याप्रकरणी डॉ. बोरगे व रणदिवे यांची चौकशी करून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुढे काही दिवसांनी डॉ.बोरगे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. या दरम्यानच्या कालावधीत आयुक्त डांगे यांनी डॉ.बोरगे यांना निलंबित केलेले आहे.


या गुन्ह्याची सखोल चौकशी केल्यावर पोलिसांना या गुन्ह्यात डॉ. बोरगे यांचा सहभाग आढळून आला नाही, त्यामुळे कोतवाली पोलिसांनी तसा अहवाल शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक अमोल भारती यांना पाठविला. या अहवालावरून पोलिस उपअधीक्षक भारती यांनी या गुन्ह्यात डॉ. बोरगे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावाच नाही असे पत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे डॉ. बोरगे यांना बीएनएसएस १८९ प्रमाणे गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.

या संदर्भात डॉ.बोरगे म्हणाले, हा गुन्हा एका षड्यंत्राचा भाग होता. मात्र, कोणी कितीही षड्यंत्र रचले तरी सत्य एक ना एक दिवस उजेडात येत असते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच या अपहाराचा प्रकार डॉ.पंकज जावळे हे आयुक्त असताना आपणच उघडकीस आणला होता. तरीही विनाकारण आपल्याला या गुन्ह्यात गोवले गेले, हे पोलीस तपासात समोर आले असल्याचे ही त्यांनी सांगितले.