AMC : नगर : अहिल्यानगर महापालिकेत (AMC) तांत्रिक दृष्ट्या आवश्यक असणारी अभियंते, विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), इतर तांत्रिक ४५ पदे भरणार आहेत. बिंदू नामवलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पद भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे (TCS) प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याशी करारनामा केला आहे. कामकाजात येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
अत्यावश्यक असलेली ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय
महापालिकेचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर झाल्यापासून आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा अधिक असल्याने रिक्त पदे भरता आलेली नाहीत. त्यामुळे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे कामकाजातील अडथळा दूर करण्यासाठी अत्यावश्यक असलेली ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश
अशी भरण्यात येणार पदे (AMC)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ३, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) – १, अभियांत्रिकी सहाय्यक – ८, विद्युत पर्यवेक्षक – ३, लिपीक टंकलेखक – १३, संगणक प्रोग्रॅमर – १, पशुधन पर्यवेक्षक – १ अशी ४५ पदे भरण्यात येणार असून, पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्याशी करारनामा करण्यात आला आहे. लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.