AMC : नगर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला (State Government) चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज (ता. ३) अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) १७ प्रभागांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना २०१८ साला प्रमाणेच आहे.
नक्की वाचा: साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय
१७ प्रभाग व ६८ नगरसेवक
अहिल्यानगर महापालिकेत एकूण १७ प्रभाग असून ६८ नगरसेवक आहेत. प्रत्येक प्रभागात चार जागा आहेत. २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. ती एकूण लोकसंख्या तीन लाख ४६ हजार ७५५ आहे. यामध्ये एससी वर्गाची लोकसंख्या ४४ हजार ९११ आहे. तर एसटी वर्गाची लोकसंख्या तीन हजार ८१३ आहे. अहिल्यानगरमधील १ प्रभागांमध्ये २२ हजार २३४, प्रभाग २मध्ये २२ हजार १५, प्रभाग ३ मध्ये १९ हजार ३८४, प्रभाग ४ मध्ये २२ हजार ४०५, ५मध्ये १९ हजार ८९०, ६ मध्ये १९ हजार २२१, प्रभाग ७ मध्ये १९ हजार ७७९, प्रभाग ८मध्ये १९ हजार ८१२, प्रभाग ९ मध्ये २० हजार ७५६, प्रभाग १०मध्ये २२ हजार ३४४, प्रभाग ११मध्ये २० हजार ९०६, प्रभाग १२मध्ये १८ हजार ८०४, प्रभाग १३मध्ये १८ हजार ८८२, प्रभाग १४मध्ये १९ हजार ८९४, प्रभाग १५मध्ये १८ हजार ५३७, प्रभाग १६ मध्ये २२ हजार १६३, प्रभाग १७मध्ये १९ हजार ७२९ अशी लोकसंख्या दर्शवलेली आहे. प्रभाग १०मध्ये सर्वाधिक २२ हजार ३४४ लोकसंख्या आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रभाग हा १२ क्रमांकाचा आहे. या रचनेमध्ये २०११ जणगणनानुसार प्रगणक गट व हद्द निश्चित केली आहे.
अवश्य वाचा : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल
काही प्रभागांमध्ये अंशतः बदल (AMC)
अहिल्यानगर महापालिका २००३मध्ये स्थापन झाली होती. ही सहावी निवडणूक असल्यामुळे प्रभाग रचनेत काय बदल होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मागील निवडणुकी प्रमाणेच प्रभाग रचना असल्याने काही प्रभागांमध्ये अंशतः बदल करण्यात आले आहेत. यात काहींचे प्रभाग तुटले आहेत. तर काहींचे प्रभाग नव्याने जोडले गेले आहेत. त्यामुळे बदल मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
अहिल्यानगर महापालिकेमध्ये सध्या तीन वर्षांपासून प्रशासकाचा कालावधी आहे. त्यातच आता राज्य सरकारने प्रभाग रचना जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली होती. त्यानुसार आयोगाकडे त्यांनी सर्व माहिती पाठवली होती. आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नगरमध्ये प्रभागात तीन जागा असणार की चार याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, शेवटी पूर्वीप्रमाणेच प्रभागात चार नगरसेवक राहिले आहे.
यंदा ज्या वेळेला प्रभागाची रचना नव्याने करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी प्रभागाची तोडफोड करण्यात आलेली आहे. काही प्रभाग हे आडव्या नकाशामध्ये करण्यात आले तर काही उभे पट्टे करण्यात आले. त्यामुळे अनेक गल्ली व कॉलनीतला भाग हा यातून तोडण्यात आलेला आहे, असे प्राथमिक स्तरावर दिलेल्या नकाशावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता ज्या ज्या वेळेला हरकतीची वेळ येईल त्या त्या वेळेला हा सर्व भाग समजून येणार आहे.
मात्र, दुसरीकडे नगरसेवकांची संख्या ही तीच राहिलेली आहे. लोकसंख्येमध्ये थोडाफार बदल झालेला आहे आता हरकत घेण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी मुदत दिली असून त्यामध्ये नागरिकांनी हरकत नोंदवावी, असे आवाहन सुद्धा केले आहे. जिल्हा परिषदेबरोबरच आता महापालिकेची रणधुमाळी सुद्धा सर्वत्र सुरू झालेले आहे. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जिल्हा परिषदेच्या पाठोपाठ महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर झाल्यामुळे राजकीय हलचालींना वेग आला आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. या प्रभागांची चतुःसीमा लवकरच नागरिकांसाठी अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. प्रारुप प्रभाग रचनेबाबच्या हरकती अथवा सूचना १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात लेखी स्वरुपात स्वीकारल्या जाणार आहेत.