AMC : नगर : अहिल्यानगर महापालिका (AMC) निवडणुकीच्या दृष्टीने प्रारुप प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने जाहीर केली. त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मतदार असलेल्या या भागात कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार आणि निवडणुकीत (Election) कोण बाजी मारणार यावर राजकीय (Political) चर्चा रंगू लागली आहे.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
या प्रभागाची व्याप्ती
भिस्तबाग चौक, शिंदेनगर, वैदुवाडी, श्रमिकनगर, रावसाहेब पटवर्धन हॉल, डौले हॉस्पिटल, रासने नगर, प्रेमदान हडको, प्रोफेसर कॉलनी, ऑल इंडिया रेडिओ, नोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, बिशप लॉईड कॉलनी, गॅलक्सी हॉस्पिटल, पोस्ट कॉलनी, गणेश चौक, सिव्हिल हडको, भाग्योदय सोसायटी, बँक कॉलनी, पोलीस कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, वैभव सोसायटी, रेणावीकर कॉलनी, प्रतिभा कॉलनी ही या प्रभागाची व्याप्ती आहे.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
या प्रभागातून ही नावे चर्चेत (AMC)
या प्रभागातून माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा, विणा बोज्जा, प्रसिद्ध मारुतीराव मिसळचे संचालक अमित खामकर, माजी नगरसेवक तायगा शिंदे, मनोज दुल्लम, नितीन शेलार, महेंद्र गंधे, शिवसेनेचे चंद्रकांत शेळके आदींची नावे चर्चेत आहेत.
बोज्जा हे मागील निवडणुकीचा अपवाद वगळता महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. ते फटाका असोसिएशनचे पदाधिकारीही आहेत. बोज्जा दाम्पत्य व्यावसायिक, धार्मिक व सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. अमित खामकर यांनी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माध्यमातून प्रभागात मोठा जनसंपर्क तयार केला आहे. महेंद्र गंधे, मनोज दुल्लम व नितीन शेलार हेही या प्रभागात नगरसेवक राहिले असल्याने मतदारांना ते माहिती आहेत. हे तिघेही भाजपशी संलग्न आहेत.
याशिवाय तायगा शिंदे हे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे समर्थक समजले जातात. त्यामुळे या प्रभागात भाजपकडून इच्छुक उमेदवार जास्त असल्याची चर्चा आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, काँग्रेस हेही उमेदवार उतरवू शकतात. शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकरही या प्रभागातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागातून कोणता पक्ष कोणाला तिकीट देणार व कोण निवडणुकीत बाजी मारणार यावर नगरकरांचे लक्ष लागले आहे.