
Amol Khatal : संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची (Zilla Parishad Schools) दुरवस्था, खाजगी शिक्षण संस्थांकडून (private educational institutions) शिक्षकांवर होणारा अन्याय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फी वसुलीच्या नावाखाली पालक व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि अमानुष वागणुकीबाबत आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले.
नक्की वाचा : कृषी विद्यापीठांची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली घसरण दुर्दैवी : सत्यजित तांबे
जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत चिंताजनक
आमदार खताळ म्हणाले की, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत चिंताजनक असून जीर्ण इमारतींमुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा शाळांच्या दुरवस्थेकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मतदारसंघातील काही खाजगी शिक्षण संस्थांकडून शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी पाठविले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या संस्थाचालकांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
अवश्य वाचा : नेमकं कोणाचा फोन आला? आमदार रोहित पवारांनी वेगळाच संशय व्यक्त केला
मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत (Amol Khatal)
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फी न भरल्यास पालकांवर दंड आकारणे, विद्यार्थ्यांना वर्गात बसू न देणे किंवा शाळेच्या बसमधून खाली उतरवणे अशा प्रकारच्या धमक्या देऊन अमानुष व बेकायदेशीर वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क आणि मानसिक आरोग्य अबाधित राहण्या साठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करत “शिक्षण हा अधिकार आहे, व्यवसाय नाही. राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत,” अशी ठाम भूमिका आमदार अमोल खताळ यांनी मांडली.


