Amol Khatal : संगमनेर : मागील दोन वर्षांपासून सतत तोट्याच्या विळख्यात सापडलेल्या कांदा उत्पादक (Onion Producer) शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) अत्यंत तीव्रतेने मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. वाढता उत्पादन खर्च आणि घसरते बाजारभाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
नक्की वाचा : ‘त्या’ ३१ गायींच्या मृत्यूचे कोडे उलगडले; अतिप्रथिनांचा वापर ठरला जीवघेणा
शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल शून्य
आमदार खताळ म्हणाले की, एकरी कांदा उत्पादनासाठी सुमारे १ लाख रुपयांहून अधिक खर्च होत असताना बाजारात केवळ ८ ते १० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही उत्पादनातून साधा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल शून्य ठरत आहे. खत, बियाणे, मजुरी, औषधे, पाणी आणि वाहतूक या सर्व बाबींमध्ये वाढलेला खर्च लक्षात घेतला तर शेतकरी अक्षरशः कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
शासनाने हस्तक्षेप करावा (Amol Khatal)
प्रचंड मेहनत करूनही शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. कांदा उत्पादक आज आर्थिक संकटाच्या कडेलोटावर उभा आहे. बदलते निर्यात धोरण, अचानक होणाऱ्या निर्यातबंदीचे निर्णय आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचेही त्यांनी नमूद केले. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यात धोरणात स्थैर्य आणावे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. केवळ आश्वासनांनी प्रश्न सुटणार नाही; ठोस आणि तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.



