Amol Khatal : संगमनेर : संगमनेर विधानसभा क्षेत्रामध्ये (Sangamner Assembly Constituency) बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी तत्परतेने पुढाकार घेतला आहे. बिबट्यांचे (Leopard) सर्वेक्षण करून त्यांची नसबंदी (Leopard Sterilization) करण्यासंदर्भातील मागणी आमदार खताळ यांनी राज्य सरकार व संबंधित विभागांकडे केली होती. त्यानुसार या प्रस्तावाची प्रशासकीय प्रक्रिया आता केंद्र सरकार पातळीवर पोहोचली असल्याची माहिती उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांनी पत्राद्वारे दिली आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
मुख्य वनविभाग कार्यालयात प्रस्ताव सादर
१६ जानेवारी २०२५ रोजी आमदार खताळ यांनी याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने अहिल्यानगर वनविभागाने मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संबंधित प्रादेशिक कार्यालयामार्फत हा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आला. नागपूर कार्यालयाने पुढे हा प्रस्ताव अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव), पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. तथापि, अद्याप या प्रस्तावास मंजुरी प्राप्त झालेली नसून या दृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचे उपवनसंरक्षकांनी कळविले आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
याबाबत आमदार अमोल खताळ म्हणाले, (Amol Khatal)
“संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला असून ग्रामीण भागातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी, महिलावर्ग व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बिबट्यांचे वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण व नसबंदी अत्यावश्यक आहे. प्रस्तावास लवकर मंजुरी मिळावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.



