नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन पायउतार झालेल्या आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर स्टार प्रचारकाची (Star Campaigners) जबाबदारी देण्यात आली आहे.
नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये ‘त्या’ महिलांसाठी बदल; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील स्टार प्रचारक (Amol Mitkari)
लातूर येथे मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेले सूरज चव्हाण आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात पक्षाची बाजू मांडणार आहेत. याशिवाय, पक्षाकडून सर्व मंत्र्यांसह अभिनेते सयाजी शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अजितदादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च – अमोल मिटकरी (Amol Mitkari)
अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन आपली हकालपट्टी झाल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. अजित दादांचा कार्यकर्ता असायला नशिब लागतं, तितका नशिबवान मी आहे. आज अजित दादांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे असलेले पद सर्वोच्च असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.
अवश्य वाचा: शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता २०२६ ला होणार
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत भाकरी फिरवत अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आणखी दोन प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते. त्यावेळी वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवारांनी मिटकरी यांची उचलबांगडी केल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये कटुता निर्माण झाली असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना कार्यमुक्त केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र,अवघ्या काही दिवसांतच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.



